Join us  

रिअ‍ॅलिटी शोमधील वास्तवाकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 4:01 AM

‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे एका रात्रीत मुलींना प्रसिद्धी मिळते, छोट्या पडद्यावर झळकायची संधी मिळते, त्यामुळे पालक मुलींना या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला लावतात. काही वेळा तर जबरदस्ती करतात, अशी उदाहरणेही समोर आली आहेत.

मुंबई : ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे एका रात्रीत मुलींना प्रसिद्धी मिळते, छोट्या पडद्यावर झळकायची संधी मिळते, त्यामुळे पालक मुलींना या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला लावतात. काही वेळा तर जबरदस्ती करतात, अशी उदाहरणेही समोर आली आहेत. रिअ‍ॅलिटी शोंच्या झगमगाटाला दुसरीही बाजू आहे. या शोज्मुळे मुलींना लहानपणातच ग्लॅमर आणि प्रसिद्धीची चटक लागते. ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिना’च्या निमित्ताने या रिअ‍ॅलिटी शोमधील वास्तवाकडे पालकांनी लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. बऱ्याचदा पालकांच्या अपेक्षांचे ओझे या शोदरम्यान मुलांवर लादले जाते. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखून लहान मुला-मुलींवरील हा ताण कमी करावा, असेही म्हटले आहे.रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतल्याने शोचा टीआरपी वाढविण्यासाठी लहानग्यांकडून अवास्तव मेहनत करून घेतली जाते. तर या शोज्मधून मुलांमधल्या कलेला, गुणवत्तेला संधी मिळते, व्यासपीठ मिळते असे शोच्या निर्मात्यांचे म्हणणे असते. ते काही अंशी खरे असले तरी या शोज्मध्ये सहभागी होणाºया मुलींना त्याची किंमत मोजावी लागते. मुली कमी वयात हे यशापयश पचवू शकत नाहीत. यातल्या स्पर्धेमुळे त्या मानसिक तणावाला बळी पडतात, असेही पाहणीत आढळले आहे. रिअ‍ॅलिटी शोमधील मुलींच्या पालकांच्या अपेक्षेपायी या मुलींच्या बालपणाचा यात बळी जातोय, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन शहा यांनी सांगितले की, रिअ‍ॅलिटी शोमध्ये कोणत्या मुलींनी सहभाग घ्यावा याचे वर्गीकरण सर्वप्रथम व्हायला पाहिजे. याचा शोध आई-वडिलांनीच घ्यायला हवा. मुलींना रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याची खरेच आवड आहे की छंद? जर छंद असेल तर त्यांना त्या शोमध्ये टाकण्यास काही हरकत नाही. कारण, ज्या मुलांना कोणत्याही गोष्टीचा छंद असतो तेव्हा त्यांना कितीही अपयश आले तरीही त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. छंद असेल तर त्यांची निराश होण्याची शक्यता तशी कमी असते, पण आवड असेल तर त्यांना यश आणि अपशय या दोन्ही बाजू समजावून सांगितल्या पाहिजेत. कारण फक्त आवड असणाºया मुलांना अपयश पचत नाही. परिणामी, बालवयात त्यांना नैराश्य येते.रिअ‍ॅलिटी शोला जाण्यापूर्वी आई-वडिलांनी मुलींची मानसिक तयारी करून घ्यावी. आई-वडिलांना जमत नसेल तर त्यांनी एखाद्या चाइल्ड कौन्सिलरकडे मुलींना घेऊन जावे.मुले या रिअ‍ॅलिटी शोचा इतका गांभीर्याने विचार करतात की, त्यात अपयश आल्यावर इतकी निराश होतात की, मुली हुशार असूनसुद्धा मागे राहतात. अपयश पचवणे सोपे नाही, तितकेच यश पचवणेही सोपे नसते. आई-वडिलांनी मुलींना कोणत्याही शोमध्ये जाण्यास भाग पाडू नये. मुलांची इच्छा नसताना त्यांनी त्यात सहभाग घेतला आणि त्यात त्यांना अपयश आले तर त्यांचा आत्मविश्वास कायमचा तुटतो.पालकांनी सुज्ञपणे विचार करायला हवामुळात मुलींनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणे हे बहुतांश वेळेला पालकांच्याच इच्छेवर अवलंबून असते. काही वेळा पालक खरेच मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना त्यात सहभागी होण्यासाठी पाठवितात. पण त्याचा अतिरेक होता कामा नये, असे आवर्जून वाटते. अतिरेक म्हणजे त्याचे व्यावसायिक स्वरूप आणि त्यातून मुलींची पिळवणूक होते. मुलांना गाण्याच्या, नाचण्याच्या किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या क्लासला धाडले जाते. मुलींच्या भावनांशी खेळले जाते. या रिअ‍ॅलिटी शोज्चे सध्या पेव फुटले आहे. मुलींचे भावनिक इश्यू काढून त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्नही कित्येक वेळा केला जातो. मुळात एका रात्रीत स्टार होण्याची जी काही कल्पना पालकांच्या मनात असते, त्यातूनच या सगळ्या गोष्टी तयार होतात. पण या शोज्मधून मुलींच्या कलागुणांना किती वाव मिळतो, त्यांचा कस तपासला जातो का? शिवाय त्या चॅनेलची कमर्शिअल बाजू या सगळ्यांचा पालक आणि आयोजकांनी विचार करायला हवा. - डॉ. सारंग सुरासे, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :मुंबई