Join us  

गोरेगावात शाळेच्या फीवाढविरोधात पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

हायकोर्टाच्या निकाला नंतर निर्णय घेऊ : शाळा प्रशासनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव (पूर्व) दिंडोशी येथील यशोधाम ...

हायकोर्टाच्या निकाला नंतर निर्णय घेऊ : शाळा प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव (पूर्व) दिंडोशी येथील यशोधाम शाळेने विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात फी भरण्यासाठी वेठीस धरू नये व नवी फीवाढ करू नये या मागणीसाठी नुकतेच येथील पालकांनी एकत्र येऊन आंदोलन करीत विरोध दर्शविला. मात्र शाळा प्रशासनाने यावर हा विषय हायकोर्टात आहे. तो निकाल आल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे सांगितले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे सावट आले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. समाजातील प्रत्येक घटकावर लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाला असून यात विद्यार्थीही सुटले नाही. शिक्षण पद्धतीत बदल होऊन ऑनलाईन शिक्षणप्रणाली स्वीकारली गेली; परंतु हे सगळे होत असताना काही खासगी शाळांनी राज्य सरकारने पालकांकडून फी घेऊ नये, या आवाहनाला न जुमानता विद्यार्थी व पालक यांना वेठीस धरले आहे.

गोरेगावच्या यशोधाम शाळेनेही विद्यार्थी व पालकांना फी भरण्यासंदर्भात तगादा लावत दोघांचेही मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेने न थांबता वर्ष २०२१ ते २०२२ या वर्षात फीवाढीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू केली. परंतु याचा कोणताच परिणाम झाला नाही. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व जोगेश्वरी येथील शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याचा कोणताही फायदा झाला नाही.

अखेर पालकांचा सबुरीचा बांध फुटला. त्यांनी फीवाढीच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारत व संघटित होत यशोधाम शाळेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले. यावेळी एक निवेदन शाळा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी हायकोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही आपणास आमचा निर्णय कळवू, असे येथील पालकांना शाळा प्रशासनाने सांगितले.

या प्रकरणी मुंबईचे उपमहापौर ॲड. सुहास वाडकर यानी आंदोलनकर्त्यां पालकांना भेटून त्यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेत लवकरात लवकर आपण शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून या विषयाबाबत काय मार्ग काढता येईल ते पाहू, असे आश्वासन दिले.

-------------------------------------------