Join us

पालघरच्या शिल्पकारांचेच पानीपत

By admin | Updated: October 23, 2014 01:20 IST

ठाणे जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून भारताच्या नकाशावर दिमाखाने झळकत होता.

डहाणू: ठाणे जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून भारताच्या नकाशावर दिमाखाने झळकत होता. त्या ठाणे जिल्हा विभाजनाची मागणी कित्येक वर्षांपासून येथील जनतेने राजकीय पुढाऱ्यांनी शासनाकडे लावून धरली होती. त्याचे विभाजन होणे आवश्यक असल्याने माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच आमदार आनंद ठाकूर यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून शासनास विभाजन करण्यास भाग पाडले. काँग्रेसनेही या निर्णयाची राजकीय अपरीहार्यता लक्षात घेवून तातडीने हे विभाजन केले. त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षांना मिळेल असा हेतू त्या मागे होता. परंतु, प्रत्यक्षात या नव्या जिल्ह्याने त्याचे शिल्पकार असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभूत करून त्यांचे पानीपत घडविले.जगातील एकूण १९५ देशांपैकी १२० देशांच्या लोकसंख्या एवढी ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या होती. हा जिल्हा सागरी, नागरी आणि डोंगरी म्हणून ओळखला जात होता. शहरीकरणाबरोबरच ग्रामीण आदिवासी भाग असलेला हा जिल्हा आशिया खंडातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला जिल्हा होता. या एका जिल्ह्यात सात महानगरपालिका आणि पाच नगरपालिका होत्या. तर लोकसंख्या एक कोटी दहा लाख होती. विशेष म्हणजे जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, डहाणू आणि पालघर या भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सोयी, सुविधांचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणे ये-जा करणे कठीण होत होते. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने जिल्हा विभाजनाची मागणी होत होती.दरम्यान पालघर मतदारसंघातील माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच आनंदभाई ठाकूर यांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वेळोवेळी जिल्हा विभाजनाचे महत्व पटवून सांगितल्यानंतर मंत्रिमंडाळात हा विषय मांडून निर्णय झाला आणि १ आॅगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा म्हणजेच राज्यातील ३६ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.परंतु नुकतेच महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तर पानिपत झालेच शिवाय जनतेने चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची नगण्य मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दिली. राष्ट्रवादीला ६००१६ तर काँग्रेसला ८०८१५ एवढी मते मिळाली. विशेष म्हणजे त्याच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची एवढी दारूण अवस्था जनतेने केली नव्हती. एकापरीने या जिल्ह्याचे विभाजन करणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जो अक्षंम्य विलंब लावला त्याबद्दलचा रोष या मागे असावा तसेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय जव्हारला न ठेवता पालघरला ठेवल्यामुळे विक्रमकड, डहाणू, जव्हार या तीन मतदारसंघातील जनतेचा रोषही या मागे असावा असा तर्क लढविला जात आहे.