लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चारच दिवसांपूर्वी राबोडीतील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अजूनही तणावाचे वातावरण असताना शुक्रवारी सकाळी अचानक घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पोलीस आणि महापालिका यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.
ठाण्यातील राबोडी परिसरात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास के व्हिला शाळेजवळील देवदीप सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील १०४ क्रमांकाच्या डेव्हिड सरोसे यांच्या सदनिकेमध्ये अचानक स्फोट झाल्याचा आवाज झाला. या स्फोटाची भीषणता इतकी मोठी होती की, घरातील एक भिंत पडून दरवाजाचेही मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर परिसरात बाॅम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे या ठिकाणी तातडीने राबोडी पोलिसांसह बाॅम्बशोधक-नाशक पथक, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि अग्निशमन दलही दाखल झाले. गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती तपासाअंती समोर आली. घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी गुन्हे शाखेची पथके
राबोडीमध्ये २४ नोव्हेंबर रोजी दुपारी मोटारसायकलवरून जाणाऱ्या जमील यांची अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा स्फोट की बॉम्बस्फोट? असे अनेक तर्कवितर्क केले जात होते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता घटनास्थळी बॉम्बशोधक-नाशक पथकासह गुन्हे अन्वेषण विभागाची पथकेही तातडीने दाखल झाली होती. मात्र, संशयास्पद काही आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, गॅसचा पाइप लिकेज झाल्याने हा स्फोट झाला. त्या ठिकाणी केवळ गोदाम आहे. कोणीही तिथे वास्तव्याला नव्हते, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.