Join us  

पॅन कार्ड कंपनीचे संचालक मोकाट! गुंतवणूकदारांचा सेबीवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:24 AM

देशातील लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या पॅनकार्ड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा नोंदवण्यास सेबीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.

मुंबई : देशातील लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या पॅनकार्ड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा नोंदवण्यास सेबीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डीनेशन कमिटीने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेबीकडून सुरू असलेल्या कंपनीच्या मालमत्ता लिलावाच्या प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे.कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले की, राज्यातील सुमारे ३५ लाख गुंतवणुकदारांना पॅनकार्ड कंपनीकडून परतावा मिळणे बाकी आहे. कंपनीच्या मालमत्ता विकून सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने १२ मे २०१७ रोजी दिल. मात्र सेबीकडून कंपनीच्या मिळकतींचा सुरू असलेला लिलाव व्यवहार संशयास्पद आहे. लिलावात मिळकतींची रक्कम ही ५० ते ६० टक्क्यांनी कमी दाखवली आहे. याशिवाय गुंतवणूकदारांचे म्यॅच्युरिटी सर्टिफिकेट जमा करण्यासाठी सेबीची विशेष यंत्रणा नाही. त्यामुळे सेबीने गुंतवणूकदारांचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण करण्याची मागणी कमिटीने केली आहे. मिळकतींच्या लिलाव प्रक्रियेत गुंतवणुकदारांच्या किमान ६ तज्ज्ञ सदस्यांना सामील करण्याचे आवाहनही केले आहे.महत्त्वाची म्हणजे मिळकतींचा लिलाव करून शासकीय देणी वसूल केली जात आहे. मात्र त्याआधी सामान्य गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याची मागणी कमिटीने केली.राज्यव्यापी आंदोलन-राज्यातील लाखो गुंतवणूकदार ३० जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे कमिटीने सांगितले. त्यात ३० जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर त्या-त्या जिल्ह्यातील गुंतवणूकदार धरणे देतील. त्यानंतरही सेबीने मागण्यांकडे लक्ष दिले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा कमिटीने दिला आहे.