Join us  

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 2:18 AM

मेघना पेठे, शीतल साठे, मल्लिका अमर शेख मानकरी, मंगेश बनसोड यांना दुसरा बलुतं पुरस्कार

मुंबई : पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१९चा दया पवार स्मृती पुरस्कार कथा-कादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्री-लेखिका मल्लिका अमर शेख आणि लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सोहळा शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होईल.

यंदाचा हा तेविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गतवर्षी बलुतंच्या चाळिशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृत बलुतं पुरस्कार सुरू करण्यात आला होता. या वर्षी तो रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर केला आहे. ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मीकी यांच्या ‘जूठन’ या आत्मकथनाचा मंगेश बनसोड यांनी मराठी अनुवाद केला आहे.

पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकार-कथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.