Join us  

बेकरी उत्पादनाचे पॅकिंग तिपटीने महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:13 AM

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर शनिवारपासून बंद होणार असला, तरी त्याचा मोठा फटका बेकरी उद्योगाला बसू लागला आहे.

- चेतन ननावरे मुंबई : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर शनिवारपासून बंद होणार असला, तरी त्याचा मोठा फटका बेकरी उद्योगाला बसू लागला आहे. खारी, टोस्ट आणि नानकटाई बिस्किटांच्या पॅकिंगसाठी कागदी पिशव्यांचा वापर केल्याने पदार्थांचा पॅकेजिंग खर्च तिपटीने वाढला आहे. त्यामुळे बेकरीचालकांसह ग्राहकांसमोरील समस्यांत वाढ झाली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, वनस्पती तेलापासून तयार होणारे हे पदार्थ कागदी पिशव्यांमध्ये तेल सोडत आहेत. त्यामुळे पदार्थांची आयुमर्यादा कमी होत आहे. कुरकुरीत आणि कडक स्वरूपात असणाऱ्या पदार्थांमधील तेल पिशव्यांनी शोषून घेतल्याने पदार्थ नरम पडून लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी आतापासूनच बेकरीचालकांकडे येऊ लागल्याचे एका चालकाने सांगितले. परिणामी, चार ते पाच दिवसांचा माल एकत्रित नेणारे ग्राहक आतापासूनच एक ते दोन दिवसांचा माल घेऊन जात आहेत, त्यामुळे एकीकडे पॅकेजिंग खर्च वाढला असताना, धंदा बसू लागल्याची प्रतिक्रियाही बेकरीचालक व्यक्त करत आहेत.प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत करत असलो, तरी त्याला बेकरी उत्पादकांचा विरोध असल्याची प्रतिक्रिया इंडिया बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष खोदादाद इराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. इराणी म्हणाले की, बेकरी उत्पादनांची आयुमर्यादा वाढवण्याचे काम प्लॅस्टिकने केले होते. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत करावे लागत आहे. या बंदीचा सर्वात मोठा फटका बेकरी उद्योगाला सहन करावा लागत आहे.प्लॅस्टिक पिशव्यांअभावी खारी, टोस्ट, बिस्कीट असे पदार्थ कागदी पिशव्यांमधून द्यावे लागत आहेत. त्यामुळे ते लवकर खराब होत आहेत. पाव आणि ब्रेडसारखे पदार्थ तर प्लॅस्टिकशिवाय काही तासांत खराब होणार आहेत. ते कागदातून दिल्यास त्यांना मुंग्या किंवा बुरशी लागण्याची भीती असते. त्यामुळे कागद हा बेकरी उत्पादनांसाठी सक्षम पर्याय नसून योग्य पर्याय शोधण्याची गरज आहे.>वातावरणाचा तापमुंबईतील हवामान उष्ण दमट असते, बेकरी उत्पादनांवर त्याचा विपरित परिणाम होतो. या वातावरणात प्लम केकसारखे पदार्थ ग्राहकांना देणे कठीण होत आहे. कारण थेट केकला हात लावल्यास ग्राहक तो स्वीकारणार नाहीत. हातमोजे घालून पदार्थ देण्याचे काम केले, तर हाताला खाज सुटते. कागदातील केक दिसत नसल्याने ग्राहक तो उघडून दाखवायला सांगतात. अशा परिस्थितीत पारदर्शी प्लॅस्टिक नसल्याने अनेक समस्या येत आहेत.>बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट का? छोट्या, मोठ्या बेकºयांवर या निर्णयाने संक्रांत आली असली, तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट दिली आहे. उत्पादनाच्या ठिकाणी पॅकेजिंग करणाºया बेकºयांना निर्णयातून सूट आहे. त्यातही पॅकेजिंगवर ठरावीक माहिती छापणे बंधनकारक आहे. सर्व बेकºया उत्पादकांना ते शक्य नाही. त्यामुळे बेकरी आणि कंपन्यांंमध्ये होणारा दुजाभाव अनाकलनीय असल्याचा आरोप बेकरीमालकांमधून होत आहे.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी