Join us  

आयडॉलच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी संकुलात फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:14 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि सर्वच संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुंबई विद्यापीठातील आयडॉलमध्ये ...

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि सर्वच संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुंबई विद्यापीठातील आयडॉलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेदरम्यान पुस्तके दिली जातात. मात्र प्रवेश घेऊन महिना उलटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध केली नाहीत. आयडॉलमध्ये पुस्तकांसाठी वारंवार फेऱ्या मारल्यानंतरही विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येते. त्यामुळे काही दिवसांत होणाऱ्या पहिल्या सत्र परीक्षेची तयारी कशी करायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोेर पडला आहे.

आयडॉलच्या २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला १२ ऑक्टोबरला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात आल्याने काही दिवसांतच आयडॉलकडून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आयडॉलकडून प्रवेशप्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत राबवण्यात आली. २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्रासाठी ५६ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आयडॉल हे मुंबई विद्यापीठाचे सर्वांत महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. पुस्तके वेळेत छापून विद्यार्थ्यांना पुरवण्याकडे लक्ष देण्याऐवजी कुलगुरू स्वत:साठी महागड्या गाड्या खरेदी करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. विद्यापीठाची स्वत:ची प्रिटिंग प्रेस असताना पुस्तके छापण्यास कसा विलंब होतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात आयडॉल प्रशासनाशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता यंदापासून सत्र पद्धत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने पुस्तके छपाईसाठी पाठवण्यात आली आहे. पुस्तके छपाईचे काम सुरू असून, लवकरच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी माहिती उपकुलसचिव (जनसंपर्क) यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात असताना विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधील गर्दीचा सामना करत कलिना कॅम्पस गाठावे लागत आहे. मात्र पुस्तकांबाबत विद्यापीठ प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येते. बस, रिक्षा करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून न देता विद्यापीठ त्यांच्या जिवाशी खेळत आहे.

- सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्य, युवा सेना