Join us  

‘त्या’ १२ कोटी रुपयांचा मालक अजूनही पडद्याआडच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:09 AM

बनावट पोलीस धाड प्रकरण; टिपरसह दोघे विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विलेपार्लेच्या हॉटेल बावा इंटरनॅशनलमध्ये बनावट ...

बनावट पोलीस धाड प्रकरण; टिपरसह दोघे विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विलेपार्लेच्या हॉटेल बावा इंटरनॅशनलमध्ये बनावट पोलीस बनून १२ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. मात्र त्या १२ काेटी रुपयांचा मालक अजूनही पडद्याआडच असून अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून उघड करण्यात आलेली नाही.

विलेपार्ले पोलिसांनी कार्तिक ऊर्फ लक्ष्मणला ताब्यात घेतले आहे, जो या सर्व प्रकरणात टिपर असल्याची माहिती आहे. तर आसिफ सय्यद असे ताब्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. साेमवारी या दोघांना २५ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आसिफ हा १७ फेब्रुवारीला हॉटेल बावा इंटरनॅशनलमधून पैशांची बॅग घेऊन पसार झाल्याचा आरोप त्याच्यावर असून त्याने आत्मसमर्पण केल्याचे त्याचे वकील टी. ए. ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी नऊ जणांना अटक केली. ज्यात प्रेमचंद जयस्वाल हा तोतया पोलीस बनल्याची माहिती आहे. तिघांच्या अटकेबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

पोलिसांनी अटक केलेल्या आरिफ सय्यद आणि आसिफ सय्यद या दोघा भावांचे वकील ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार १८ फेब्रुवारीलाच विलेपार्ले पोलिसांनी आरिफला अंधेरीच्या नामांकित हॉटेलमधून ताब्यात घेतले. मात्र दोन दिवसांनंतर म्हणजे १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्याला अटक दाखवली. पण १७ फेब्रुवारी रोजी जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा तो मुंबईतच नव्हता. तर आसिफने आत्मसमर्पण केले.

* पैसे मालकाची लपवाछपवी !

हॉटेलमधून लंपास करण्यात आलेले १२ कोटी रुपये ही लहान रक्कम नाही. त्यामुळे या पैशांच्या खऱ्या मालकाने स्वतः तक्रार का दाखल केली नाही, त्याबाबत लपवाछपवी का करत आहे? आनंद इंगळे यांना या प्रकरणात तक्रारदार का बनविण्यात आले? मालाड पूर्वच्या हिराबाजारातून आधी पैसे का नेण्यात आले? दिंडोशी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न करता घटनेच्या तब्बल दोन दिवसांनंतर तो विलेपार्ले पोलीस ठाण्यात का दाखल करण्यात आला? असे सवाल ॲड. ठाकूर यांनी उपस्थित करत त्यांच्या अशिलाला विनाकारण या सर्व प्रकरणात गोवण्यात आल्याचाही आरोप केला आहे.

........................