Join us  

'आयुसास नेचर के सुपरहिरो' उपक्रमात तब्बल १ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 8:50 PM

विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी उपक्रमाचं आयोजन

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून बऱ्याच वर्षापासून  ''झाडे लावा, झाडे जगवा" मोहीम राज्यभर राबवली गेली आहे. त्यामुळे नक्कीच सर्वत्र वृक्षवल्ली वाढविण्यास हातभार लागला आहे पण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. फक्त सरकार आणि  एनजीओ वर अवलंबून न राहता अशा मोहिमेत नागरिकांच्या पुढाकाराची फार गरज आहे. 

स्थानिक झाडे - जैव-विविधता (बायो डायव्हर्सिटी) टिकविण्यात आणि वाढविण्यात मोलाची भूमिका बजावतात. म्हणूनच वृक्षारोपणासाठी आपण  स्थानिक झाडे लावण्यावर ( वड, पिंपळ, आंबा..) भर देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावू शकतो. "आयुसास नेचर के सुपरहिरो" या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी हा विचार पोहोचविण्याची कामगिरी  लोकमत आणि सपट आयुसास ने सुरु केली आणि नुसत्या महाराष्ट्रातील नाही तर देशातील  एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी  यात सहभाग घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक झाडे आणि जैव-विविधतेचे महत्व पटले आहे. प्रत्येक  सहभागी विद्यार्थ्यास पुरस्कार विजेते ट्री इ- गाईड आणि सुपरहिरोचे प्रमाणपत्र दिले गेले. 

ट्री गाईडची मुख्य संकल्पना‘द राईट ग्रीन’प्रकल्पाच्या संस्थापक कु.आद्या जोशी यांची आहे. त्यांच्या ट्रीगाईडच्या सखोल कामाबद्दल त्यांना ‘द पोलिनेशन प्रोजेक्ट’ कडून गौरविण्यात आले आहे. तसेच अनेक वर्षे त्यांनी पर्यावरण विषयात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना स्वीडनमधील स्टॉकहोम, "चिल्ड्रन्स क्लायमेट फाउंडेशनतर्फे" आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जो 12-17 वर्षे वयोगटातील हवामान आणि वातावरणासाठी उल्लेखनीय प्रयत्न केलेल्या मुला मुलींना दिला  जातो. 

ह्या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 'नेचर के सुपरहिरो' प्रकल्पात महाराष्ट्रातील अनेक शहरातून २०० पेक्षा जास्त नामवंत शाळांनी सहभाग घेतला व सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळून विद्यार्थ्यांनी 3D आणि ऑनलाईन स्वरूपात  प्रोजेक्ट्स बनवले. एक स्थानिक वृक्ष आणि त्याच्या जैवविविधतेशी जोडलेले संबंध आणि त्याचा पर्यावरणाला होणारा फायदा असा ह्या प्रोजेक्टचा मुख्य विषय होता. अटीतटीच्या या स्पर्धेत अनेक नाविन्यपूर्ण कल्पना समोर आल्या आहेत. त्यामधून ५ उत्तम प्रोजेक्ट्स राज्यस्तरावर निवडून, विजेते ठरवणार आहेत आणि त्यांचे प्रोजेक्टस महाराष्ट्र पर्यावरण विभागाला सादर केले जाणार आहे. अशा या विविध उपक्रमातून प्रत्येक नागरिकांनी खारीचा म्हणजेच मोलाचा वाटा उचलून करूया भारतमातेला सुजलाम सुफलाम.