Join us  

शाळाबाह्य मुलांचा शोध पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:52 AM

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेसाठी सतत अपयशी ठरलेल्या शालेय शिक्षण विभागाने आपला बचाव करण्यासाठी पुन्हा शहरातील शिक्षकांच्या खांद्यावर शाळाबाह्य मुले शोधण्याची जबाबदारी सोपविली आहे.

मुंबई : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेसाठी सतत अपयशी ठरलेल्या शालेय शिक्षण विभागाने आपला बचाव करण्यासाठी पुन्हा शहरातील शिक्षकांच्या खांद्यावर शाळाबाह्य मुले शोधण्याची जबाबदारी सोपविली आहे. यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना संबंधित विभागाच्या शिक्षक निरीक्षकांकडून पत्रके पाठविण्यात आली असून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.२ जुलै ते ३१ आॅगस्ट यादरम्यान आपल्या शाळेच्या १ ते ३ किमी परिसरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू होऊन महिनाच उलटला असून आता पहिल्या परीक्षेच्या तयारीत असलेल्या शिक्षकांमध्ये थोपविण्यात आलेल्या या अतिरिक्त जबाबदारीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच शाळेतील ज्या शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचे काम करण्याची आवड आहे त्यांना बालरक्षक म्हणून नोंदणी करण्याच्या सूचना शिक्षक निरीक्षकांकडून करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली आहे. शाळाबाह्य मुलांचा हा अहवाल शाळांना शिक्षक निरीक्षकांना ३० आॅगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून शासनाने दिलेल्या या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. यामागे शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश असला तरी शिक्षकांचाही विचार केला पाहिजे. कधी कोणते सर्वेक्षण निघेल आणि त्यासाठी पळावे लागेल हे सांगता येत नाही अशी शिक्षकांची अवस्था झाल्याचे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केले आहे.>दखल घेतली जात नाहीशाळाबाह्य बालके शोधणे हे फक्त शिक्षकांचे काम नसून शिक्षण हक्क कायद्यानुसार इतर सरकारी यंत्रणांवरही या कामाची जबाबदारी आहे. या बालकांना शोधणे, त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे, ही देशसेवाच. मात्र ती करणाऱ्या शिक्षकांची साधी दखलही शासन घेत नाही.- प्रशांत रमेश रेडीज,सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना