Join us  

आर्थिक विवंचनेतून नौदल सैनिकाने स्वतःच रचला अपहरण व हत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : तलासरीच्या वेवजी येथील जंगलात अपहरण करून अज्ञातांनी आपल्याला जाळल्याचा नौदल सैनिक सूरजकुमार दुबे यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : तलासरीच्या वेवजी येथील जंगलात अपहरण करून अज्ञातांनी आपल्याला जाळल्याचा नौदल सैनिक सूरजकुमार दुबे यांचा जबाब एक बनाव असल्याचे उघड झाले आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून डोक्यावर कर्ज झाल्याने त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळल्याची बाब पोलीस तपासात स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

झारखंड राज्यातील सूरजकुमार दुबे (२७) हा भारतीय नौदलात सिबिंग सीमॅनपदी कार्यरत असलेला तरुण ५ फेब्रुवारी रोजी जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मृत्यूपूर्वी त्याने दिलेल्या जबानीत आपले काही अज्ञात इसमांनी अपहरण करून १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी जाळल्याचे म्हटले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी १०० पोलिसांची १० पथके तैनात करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान सूरजकुमार याने आपले चेन्नई विमानतळावरून अपहरण केल्याचे जबाबात म्हटले असले तरी तेथील सीसीटीव्हीमध्ये तो एकटाच बाहेर पडल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आपल्या अपहरणाची कुठलीही माहिती कुटुंबीयांना त्यांनी दिली नसल्याने तसेच ३० आणि ३१ जानेवारीला तो चेन्नई आणि वेल्लोर या भागात फिरत असल्याचेही आणि ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून त्याने पैसे काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. सूरजकुमार दुबे यांच्या बँक खात्यांची तपासणी केली असता शेअर बाजारात पावणेअठरा लाख रुपयांची गुंतवणूक केली असून, यात ते पूर्णपणे बुडून गेले होते. या व्यवहारातच त्यांची ७६ हजार रुपयांची देणी असल्याचे समोर आले आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक लपवली

त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्याचप्रमाणे लग्न ठरल्यानंतर सासऱ्यांकडून ९ लाख रुपयेदेखील घेतल्याचे समोर आले आहे. आपल्या कर्जबाजारीपणाची कोणतीही माहिती त्याने आपल्या घरच्यांना दिलेली नव्हती. तसेच सूरजकुमार दुबे याने १३ बँकांमधून मोठ्या रकमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याचे ‘सिबिल’कडून माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासूनही लपवली असल्याचे उघड झाल्याचे पालघर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.