Join us  

‘अन्यथा महापालिकेच्या दारातच कचरा टाकू’, विरोधकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:53 AM

मुंबई : कच-यावर प्रक्रिया न करणा-या सोसायट्यांची जलजोडणी तोडण्याचा इशारा देणा-या महापालिकेला आता राजकीय विरोधाचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये कचरा प्रकल्प नाही. दिव्याखालीच अंधार असताना पालिकेने मुंबईत दहशत पसरविली आहे, असा आरोप सर्व राजकीय पक्षांनी केला. सोसायट्यांमधील कचरा उचलणे बंद केल्यास, तोच कचरा उचलून विभाग कार्यालयांच्या दारात टाकू, असा इशारा विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी दिला आहे.कचरा उचलण्यासाठी गाड्या घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. मात्र, या प्रस्तावावर बोलताना सर्वच पक्षांनी पालिका प्रशासनाला फैलावर घेतले. सोसायट्यांना पाठविलेली नोटीस बेकायदा असून, पालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी केली. या नोटीसमुळे लोकांमध्ये घबराट असून, कचरा न उचलल्यास रोगराई वाढेल, अशी भीती विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केली. नागरिक आम्हाला दोष देत असून, त्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न सर्वच नगरसेवकांनी उपस्थित केला. कचरा समस्या हाताळण्यात प्रशासन फेल झाले आहे. त्याचा भुर्दंड मुंबईकरांना कशाला? असा सवाल नगरसेवकांनी केला. नगरसेवकांची ही नाराजी दूर करण्यासाठी पालिका प्रशासन आणि मुंबईकर ही गाडीची दोन चाकेच आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्रित काम करणे अपेक्षित असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सुचविले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका