Join us  

एकदा तरी विठूराया, गाव माझा भिजव तू...

By अतुल कुलकर्णी | Published: July 11, 2019 7:45 PM

 युवा गायक मंगेश बोरगावकर यांनी विठूरायाला साद घातली आणि मुंबईतल्या दादरचे शिवाजी मंदिर विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेले..!

- अतुल कुलकर्णीकमरेवरचा हात काढूनआभाळाला लाव तू...एकदा तरी विठूराया,गाव माझा भिजव तू...अशी आर्त प्रार्थना करत समस्त महाराष्ट्राच्या वतीने प्रसिद्ध युवा गायक मंगेश बोरगावकर यांनी विठूरायाला साद घातली आणि मुंबईतल्या दादरचे शिवाजी मंदिर विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेले..! गेली अनेक वर्षे मंगेश आषाढी एकदशीच्या निमित्ताने मुंबई, पुणे आणि लातूर येथे ‘भक्तिरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आला आहे. सगळ्यांसाठी मोफत कार्यक्रम तो करतो. देणगीची किंवा आर्थिक मदतीची कसलीही अपेक्षा न ठेवता तो हा कार्यक्रम करत आला आहे. विठ्ठलाचा महिमा वर्णन करणारी संत तुकोबारायांपासून अनेक संतांची भजनं त्याने सादर केला. कोणतेही मध्यंतर न घेता तब्बल सव्वातीन तास मंगेश एकटा गात होता, आणि श्रोते विठ्ठलाच्या नामस्मणात दंग झाले होते.

तालमली डॉ. राम बोरगावकर यांचे तबला वादन हा या मैफलीतला एक अविस्मरणीय अनुभव होता. तबल्यातून डॉक्टरेट मिळवणारे रामभाऊ जेवढे शांत, संयमी आणि विनम्र आहेत त्याच्या कितीतरी आक्रमकपणे त्यांची बोटं तबल्यावर फिरतात आणि हुकमी ताल आपल्यापुढे सादर करतात. त्यांचे तबलावादन, सोबतीला गणेश बोरगावकर, ओंकार अग्नीहोत्री, जयंत ओक, सौरभ कणसे आणि माऊली टाकळकर यांच्या साथसंगतीने मैफलीत रंग भरले नसतील तर नवल..!
यानिमित्ताने एक अनोखी जुगलबंदी अनुभवता आली ती उमेश पांचाळ या चित्रकाराची. मंगेश गात असताना उमेशने रंगमंचावरच कॅनव्हॉसवरती वारीचे रिंगणही रंगवले आणि कार्यक्रम शेवटाकडे जात असताना साक्षात विठ्ठलाची प्रतिमा त्याने मोठ्या कॅनव्हॉसवर चितारली. कार्यक्रमाचे मोजक्या शब्दात सानिका कुलकर्णीने निवेदन केले. यानिमित्ताने संगीतकार निलेश मोहरीर यांची विशेष उपस्थिती होती. बुधवारी १० जुलै रोजी मंगेशने ‘भक्तिरंग’ची मैफल मुंबईत सजवली, तर ११ तारखेला पुण्यात आणि आज आषाढीच्या निमित्ताने तो ही मैफल लातूरला, त्याच्या मूळ गावी भरवत आहे.  चित्रपट गीतांच्या जमान्यात मंगेश आवर्जून अभंग, गवळणीच्या माध्यमातून पांडूरंगाची करत असलेली सेवा आणि त्या सेवेत समस्तांना सहभागी करुन घेण्याची त्याची वृत्ती कौतुकास पात्र आहे..!(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई)