Join us  

चिंताजनक! अवयवदानाचा आलेख तिपटीने घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 1:10 AM

१९ रुग्णालयांचा प्रत्यारोपणासाठी नकार

मुंबई : कोविडच्या काळात अवयवदानाचा आलेख घसरला, अवयव प्रत्यारोपणातील धोका ओळखून या शस्त्रक्रिया काही काळ थांबविण्यात आल्या. परिणामी, राज्यासह मुंबईतील अनेक व्यक्तींना अवयवदानासाठी प्रतीक्षायादीत राहावे लागले, त्यामुळे अवयवदानाचा आलेख तिपटीने घसरला असून ही चिंताजनक बाब आहे. आज जागतिक अवयवदान दिन आहे.जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या काळात अवयवदान शस्त्रक्रियेत धोका असल्याचा समज बाळगून शहर-उपनगरातील तब्बल १९ रुग्णालयांनी अवयवदान शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. सध्या मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक व्यक्ती मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असल्याची माहिती मुंबई जिल्हे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे. सध्या शहर-उपनगरात मूत्रपिंडासाठी ३ हजार ५३६, यकृत ३५०, हृदय २७, फुप्फुस १४, हात ३ आणि स्वादुपिंडासाठी १० व्यक्ती प्रतीक्षायादीत आहेत.शहर-उपनगरातील ३८ रुग्णालयांमध्ये अवयवदानाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र कोविडच्या काळात यातील केवळ १३ रुग्णालयांनी अवयवदान प्रक्रियेस सकारात्मकता दर्शवित शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शविला. एकूण रुग्णालयांपैकी १९ रुग्णालयांनी प्रत्यारोपणासाठी नकार दर्शविला आणि ६ रुग्णालयांनी अवयवदानाविषयी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.अवयवदानासाठी पुढाकार घ्या!सध्याच्या काळात अवयवदान हे आव्हानात्मक आहे, मात्र अवयदानासाठी नियमावली तयार केली आहे. त्याच्या जवळील व्यक्तीने परदेशी वारी केली का, याची माहिती घेऊन ती व्यक्ती अवयदानासाठी योग्य की अयोग्य हे समिती ठरवते. अवयव प्रत्यारोपणाचे काम करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येते. संशयित असल्यास त्यांना त्या चमूमधून काढून निगेटिव्ह होईपर्यंत प्रत्यारोपण विभागात काम दिले जात नाही.- डॉ. एस. के . माथुर, अध्यक्ष, मुंबई जिल्हे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीअवयव प्रतीक्षायादीतव्यक्तीमूत्रपिंड ३ हजार ५३६यकृत ३५०हृदय २७फुप्फुस १४हात ०३स्वादुपिंड १०

टॅग्स :अवयव दान