Join us

विरोधी पक्षनेते पदावरून तिढा

By admin | Published: March 08, 2017 4:51 AM

महापौरपदाबरोबरच विरोधी पक्ष नेते पदावरील हक्कही भाजपाने सोडल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाशिवाय अन्य राजकीय

मुंबई : महापौरपदाबरोबरच विरोधी पक्ष नेते पदावरील हक्कही भाजपाने सोडल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाशिवाय अन्य राजकीय पक्षाला विरोधी पक्षाचे स्थान देण्याबाबत महापालिका अधिनियमात कुठेही स्पष्टता नसल्याने चिटणीस खाते बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. मिशन १०० घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाने शिवसेनेला बरोबरीत रोखले. मात्र सत्ता स्थापनेसाठी व महापौरपदासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्याने भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. एवढेच नव्हेतर, महापौर किंवा कोणत्याही समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, तसेच विरोधी पक्ष नेते पदही घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मात्र सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राजकीय पक्षाने सत्ता स्थापना केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून जाहीर करण्यात येते. तसेच त्या पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून ओळखला जातो. मात्र त्या पक्षाने विरोधी पक्षात बसण्यास नकार दिल्यास इतर कोणत्याही पक्षाला हे पद देण्याबाबत नियमात तरतूद नसल्याने महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी उद्या महापौर निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पण लेखी पत्र नाही.... भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र याबाबत अद्याप तसे पालिका चिटणीस विभागाला लेखी पत्र भाजपाने दिलेले नाही. हे पत्र आल्यानंतरच त्यावर कायदेशीर सल्ला घेता येणार आहे. कायद्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाव्यतिरिक्त अन्य कोणाला हे पद देता येत नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. हा पेच सुटत नाही तोपर्यंत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद हे रिक्त राहणार असल्याचे चिटणीस खात्यातील सूत्रांकडून समजते.निवडणुकीचा कार्यक्रम ८ मार्चला जुन्या नगरसेवकांचा कालावधी संपत आहे. मात्र या दिवशी जुन्या नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. नव्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी कोकण आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या पावतीवर महापालिका मुख्यालयात व सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. नव्या नगरसेवकांना गेट नंबर ६मधूनच प्रवेश दिला जाईल. महापौरांची निवडणूक झाल्यानंतर त्वरित नवीन गटनेत्यांची, चार वैधानिक समित्यांच्या सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. १४ मार्चला स्थायी व शिक्षण समितीची तर १६ मार्चला बेस्ट व सुधार समितीची निवडणूक होणार आहे.