Join us  

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची संधी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 3:34 AM

सामंत म्हणाले, मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा.

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून ग्रेडनुसार निकाल घोषित केला जाईल. पण, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची संधी देण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सामंत म्हणाले, मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल तर लेखी त्तसे त्यांच्याकडून घेऊन परीक्षेस बसण्याची संधी द्यावी. त्यांची परीक्षा कधी घेता येऊ शकेल, याची कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा व वेळापत्रक जाहीर करावे, अशा सूचनाही विद्यापीठांना देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.नऊ राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारअनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे विलगीकरण केंद्रे म्हणून वापरात आहेत. गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात परत येणे वाहतुकीच्या व्यवस्थेअभावी अवघड आहे. नुकतेच बंगळुरूमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. परीक्षा रद्द केलेल्या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे सामंत म्हणाले.