Opponents surrounded the Fadnavis government from corruption | भ्रष्टाचारावरून विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले
भ्रष्टाचारावरून विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी देवेंद्र फडणवीससरकारला चांगलेच घेरले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ९५० कोटींचा भ्रष्टाचार व भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महसूलमंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
पुणे जिल्ह्यातीेल हवेली येथील देवस्थानची जमिनीच्या अकृषिक वापरास परवानगी देताना महसूलमंत्र्यांनी नजराणा आकारला नाही. त्यामुळे सरकारचा ४२ कोटींचा महसूल बुडाला, तर दुसऱ्या प्रकरणात बालेवाडी परिसरातील क्रीडांगणाचा २३ एकर भूखंड विकासकास दिला गेला. ज्याची बाजारभावाने आजची किंमत ३०० कोटी आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला. मात्र, पूर्वसूचना न देता आरोप केले गेल्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जयंत पाटील यांचे भाषण कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे आ. पाटील यांनी हेच आरोप नंतर पत्रकार परिषदेत केले.
मुंबईत स्टीलला गंजू नये, म्हणून त्यावर रंग लावला जातो. मात्र, नागपुरात तशी गरज नसते. तरीही मेट्रोसाठी वापरण्यात आलेल्या स्टीलला रंग लावण्यात आला असून, त्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला, तसेच जुहू-अंधेरी येथील एसआरए प्रकरणात न्यायालयाची स्थगिती डावलून परवानगी देण्यात आली.
यात ४५० कोटींचा घोटाळा झाला आहे, तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथील नद्यांमधून रोज ४०० ट्रक्स वाळू बेकायदा काढली जात असून, त्यातही कोट्यवधी रुपये लाटण्यात आले, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी महसूलमंत्र्यांवर केले.

विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, यावर उद्या मी सभागृहात सविस्तर निवेदन करणार आहे.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री.


Web Title: Opponents surrounded the Fadnavis government from corruption
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.