Join us  

मालाड-मालवणी बौद्धविहाराचा उद्घाटन सोहळा संपन्न; कार्यक्रमाला अस्लम शेख यांची हजेरी 

By मनोहर कुंभेजकर | Published: January 29, 2023 5:24 PM

मालाड-मालवणी बौद्धविहाराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 

मुंबई: विविधतेतील एकता हे या मालाड विधानसभेच सौंदर्य आहे. विविध जाती-धर्म आणि समुदायाचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सांप्रदायिकतेला मालाड- मालवणीत थारा नाही असे प्रतिपादन मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे स्थानिक  आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी केले.

मालाड-पश्चिमेकडील, मालवणी येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन सोहळ्यात शेख बोलत होते. उद्घाटनापूर्वी मालवणी गेट क्रमांक ५ ते बुद्धविहारापर्यंत काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

आपल्या देशात विविधतेत एकता आहे. ही विविधतेतील एकता मालाड विधानसभेत मोठ्या प्रमाणावर दिसते. इथे जेव्हा गणेश चतुर्थीला मिरवणूका निघतात तेव्हा असं वाटतं जणू काही हा हिंदू बहूल मतदारसंघ आहे. ईद ला वाटतं मुस्लीम बहुल आहे. ख्रिसमसला ख्रिश्चन बहुल तर आंबेडकर जयंतीला जय भीम च्या घोषणा आसमंत दणाणून सोडतात. हीच विविधतेतील एकता या मालाड विधानसभेचं सौंदर्य आहे. हीच विविधतेतील एकता टिकवून ठेवण देशासमोर आजच्या घडीचं सर्वात मोठं आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात अस्लम शेख म्हणाले की, "१९८७ साली म्हणजेच जवळपास ३६ वर्षांपूर्वी माझे वडील रमजानअली शेख यांनी या बुद्धविहाराची पहिली वीट रचली होती. आज ३६ वर्षांनंतर या बुद्धविहाराच्या पुन:बांधणी कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते होणं  हा खरतर माझ्या आयुष्यातील विलक्षण, आनंददायी आणि सुखावणारा योगायोग आहे. माझ्या वडीलांनी जी बीजे पेरली होती ती बीजे आता वृक्षामध्ये रुपांतरीत झालेली पाहताना मनस्वी आनंद होतो. त्या वृक्षाच्या फूलांच्या  सुगंध मी अनुभवतोय. 

भगवान गौतम बुद्धाचे प्रेम, अहिंसा, शांती, दया, करुणेच्या शिकवणीचं प्रतिबिंब  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात पदोपदी उमटलेली दिसतं.याच मानवी मुल्यांची जोपासना या बुद्धविहाराच्या माध्यमातून होईल, असा विश्वास उद्घाटनपर भाषणाच्या निमित्ताने शेख यांनी व्यक्त केला.

या देशामध्ये गौतम बुद्धांसारखे महापुरुष जन्माला आले. ज्यांनी या देशातील समाजमनावर संस्कार केले. या महापुरुषांमुळेच जगाला हेवा वाटेल अशी भारतीय संस्कृती घडत गेली. ही संस्कृती भोग नव्हे तर त्याग शिकवते, हिंसा नव्हे तर  प्रेम शिकवते, संस्कृती सांप्रदायिकता नव्हे तर सर्वधर्म समभाव व सहिष्णूता शिकवते.ही संस्कृती उदारमतदवादी आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भक्कम आणि शाश्वत संस्कृती आहे. कारण गौतम बुद्धांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा पाया या संस्कृतीला लाभला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 

टॅग्स :मुंबईमालाड पश्चिम