Join us  

फक्त वाघ, सिंह म्हणजे वन्यजीव नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:07 AM

जागतिक वन्यजीव दिन; निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक जिवंत राहणे गरजेचे, अभ्यासकांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केवळ वाघ ...

जागतिक वन्यजीव दिन; निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक जिवंत राहणे गरजेचे, अभ्यासकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केवळ वाघ आणि सिंह म्हणजे वन्य जीवन नव्हे, तर मुंगीपासून हत्तीपर्यंतचा निसर्गातला प्रत्येक घटक म्हणजे वन्यजीव होय. आपण प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे असून त्यांचे संरक्षण, संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. असे केल्यास निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक जिवंत राहील, असा विश्वास वन्यजीव अभ्यासक विजय अवसरे यांनी व्यक्त केला. जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद.

पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे का?

मुंबई शहर आणि उपनगरातील विकास करताना आपण पर्यावरणाचा, निसर्गाचा विनाश करत आहोत. असाच विनाश होत राहिला तर निसर्ग जिवंत राहणार नाही. मुळात आपल्याकडे वन नाही. वन नसेल तर वन्यजीव कसे असतील याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. बोरीवली येथील नॅशनल पार्क, धारावी येथील निसर्ग उद्यान किंवा मुंबई शहर आणि उपनगरातील हिरवळीच्या ठिकाणी प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. त्यांचे संवर्धन, संरक्षणासाठी राज्य सरकार असो किंवा महापालिका, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. काम केले पाहिजे. तरच मुंबईत आहे ती वनसंपदा टिकून राहील.

वनसंपदा कशी टिकून राहील?

आपला गैरसमज असतो की वाघ आणि सिंह म्हणजे जंगल होय. प्रत्यक्षात तसे नाही. निसर्गातला प्रत्येक घटक म्हणजे जंगल होय. यात मुंगीही येते. साप, हत्ती, बिबट्या आणि हरीणसुद्धा येते. माहीम, भांडुप, शिवडी, वांद्रे येथे जेथे दलदलीचे प्रदेश आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. ती एका अर्थाने जंगलाचा भाग होय. आपण फक्त विकास करताना या सर्वांची काळजी घ्यायची आहे. असे केले तरच मुंबईत आहे ती वनसंपदा टिकून राहील.

पाणथळ जागा आणि दलदलीचे प्रदेश याचे संवर्धन होत आहे का?

वन्य जीवांमध्ये पाल, मधमाश्या येतात. शहरापासून जंगलापर्यंतचा प्रत्येक घटक येतो. मुंबईत गवताळ कुरणे वाढली आहेत. त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. कुरणांमध्ये किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेदेखील एका अर्थाने वन्यजीव आहेत. पाणथळ जागा, तलाव यांचे रक्षण केले पाहिजे. कारण येथेही मोठ्या संख्येने वन्यजीव आढळतात. मुंबईत आहे ती वनसंपदा, वन्यजीव टिकवायचे असतील तर एकत्र येऊन काम केले पाहिजे.

वनसंपदेची काळजी कशी घेतली पाहिजे?

वन्य जीवांमध्ये सर्पही येतात. एकट्या मुंबईत किमान ४० प्रजातींचे सर्प आढळतात. मधमाश्या आहेत म्हणून निसर्ग टिकून आहे. कारण त्यांच्यामुळेच फळे आणि फुले मिळत आहेत हेही आपण विसरता कामा नये. एका अर्थाने आपण जिथे कुठे राहतो तेथील निसर्ग वनसंपदा, पक्षी, प्राणी याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तेव्हा कुठे आपला निसर्ग आपले वन टिकून राहील, अन्यथा यापूर्वीप्रमाणे जसा पर्यावरणाचा नाश झाला तसाच विनाश भविष्यातही होईल. हे टाळायचे असल्यास निसर्गातला प्रत्येक घटक आपला आहे असे समजून काम करण्याची गरज आहे.

जैवविविधतेचा अभ्यास झाला आहे का?

मुंबईत राष्ट्रीय उद्यान आहे. खारफुटीच्या जागा आहेत. मात्र तरीही येथील जैवविविधतेचा सखोल अभ्यास झालेला नाही. अभ्यास होत नसल्याने पूर्वी शहरात उंच इमारती होण्याआधी कोणते पक्षी दिसायचे, कोणती झाडे होती यांची माहिती उपलब्ध होत नाही. शहराच्या विस्तारीकरणामध्ये अधिवास नष्ट होत आहेत. पक्षी-प्राण्यांबरोबरच झाडांनाही धोका निर्माण होत आहे. मुंबईत तीन मोठे तलाव आहेत. तुळशी, विहार आणि पवई या तीन तलावांचा यात समावेश आहे. पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. फार फार तर आरे कॉलनीतील तबेल्यांसाठी हे पाणी वापरले जाते. पवई तलाव १८९० साली बांधून पूर्ण झाला. त्या वेळी पवई तलाव ३७० एकर परिसरात पसरलेला होता. पावसाळ्यात पाणी वाहून १७ हजार एकर पाणलोट क्षेत्र वाढायचे. ५० वर्षांपूर्वी येथे आढळणारी जैवविविधता आता मात्र आढळत नाही.

.....................