Join us  

१५०० कुटुंबांना विधीसाठी अवघ्या तीनच खोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:45 AM

महिलांची गैरसोय; कांदिवलीच्या गौतमनगरमधील अवस्था

मुंबई : वनविभागात मोडणाऱ्या कांदिवलीच्या गौतमनगर परिसरात १५०० कुटुंबीयांसाठी स्वच्छतागृहाच्या तीन खोल्या उपलब्ध आहेत. परिणामी यामुळे महिलांची फारच गैरसोय होत असून महापालिकाही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.गौतमनगरच्या या तीन खोल्यांच्या स्वच्छतागृहांची पालिकेकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. या ठिकाणी सॅनिटायझेशन होत नाही, तसेच त्याची साफसफाई केली जात नाही. पाण्याची कोणतीही सोय नसल्याने घरातून पाणी घेऊन स्थानिकांना या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अजूनही ‘उघड्यावर सौच’ करण्याची पाळी येथील लोकांवर आली आहे. यात महिलांची फारच गैरसोय होत आहे.स्थानिक संतोष नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी स्वच्छतागृहात फक्त दोनच खोल्या होत्या, यात एक महिला आणि दुसरी पुरुषांसाठी होती. मात्र नंतर अजून एक खोली बांधण्यात आली. या ठिकाणी जवळपास १५०० खोल्या आहेत. प्रत्येक घरात तीन ते चार माणसे जरी मोजली तरी या ठिकाणची लोकसंख्या आणि गैरसोय सहन करणाºया लोकांची भयाण परिस्थिती सहज लक्षात येते. स्वच्छतेच्या बाबतीत तर इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कारण पालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे घाण आणि दुर्गंधीचे या ठिकाणी साम्राज्य आहे. याचा मैला पोईसर नाल्यात जातो. त्यामुळे पावसाळ्यात नाला भरला की, या स्वच्छतागृहांची स्थिती पाहण्याजोगी नसते. त्यामुळे याबाबत प्रशासन आणि स्थानिकांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात येत आहे.महापालिकेच्या शौचालयात घाणीचेच साम्राज्यसर्वात श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ख्याती आहे़ मात्र या मायानगरीतील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका आजही कमी पडत आहे़ याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे़ बहुतांश मुंबईकर हे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात़ असे असतानाही महापालिकेने बांधलेल्या शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे़ हजारो नागरिकांमागे बोटांवर मोजता येतील एवढीच शौचालये, अशी परिस्थिती आहे़ याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’ टीमने.