Join us  

लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीही ५० टक्केच हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

मुंबई : दोन दिवसांच्या स्थागितीनंतर कोविडवरील लसीकरणाला मंगळवारपासून पुन्हा सुरुवात झाली. मात्र कोविन ॲपमध्ये तब्बल आठशे नावे दोनवेळा आढळून ...

मुंबई : दोन दिवसांच्या स्थागितीनंतर कोविडवरील लसीकरणाला मंगळवारपासून पुन्हा सुरुवात झाली. मात्र कोविन ॲपमध्ये तब्बल आठशे नावे दोनवेळा आढळून आल्याने ३२०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. यापैकी १५९७ म्हणजे ५० टक्केच कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात हजेरी लावून लस घेतली. त्यामुळे लसबाबत संभ्रम असल्याने अद्यापही आरोग्य कर्मचारी येत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी पहिल्याच दिवशी लसीकरण मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. पालिकेने दररोज चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्याच दिवशी केवळ १९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देणे शक्य झाले. त्यामुळे रविवार आणि सोमवारी असे दोन दिवस लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली होती. मात्र मंगळवारीही या मोहिमेत फारसा फरक जाणवला नाही.

आठशे डुप्लिकेट नावे यादीमधून काढल्यानंतर महापालिकेने मंगळवारी ३२०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रांवर बोलवले होते. मात्र यापैकी १५९७ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. सर्वाधिक परळ येथील केईएम रुग्णालयात ३०७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर जे.जे. रुग्णालयात सर्वांत कमी म्हणजे १३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यामुळे दोन दिवसांत आठ हजारऐवजी केवळ ३,५२३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात पालिकेला यश आले आहे.

ॲपमधील तांत्रिक अडचण कायम

लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या वेळीही को-विन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड कायम असल्याने पालिका अधिकारी हैराण आहेत. आठशे नावे दोनवेळा आल्याचे समोर आल्यानंतर एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावले जात असल्याचेही उजेडात आले. याकडे महापालिकेने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

लसीकरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये भीती?

मंगळवारी झालेल्या लसीकरणावेळी तीन कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती लस दिल्यानंतरही उत्तम असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र केंद्रावर लस घेण्यासाठी कमी कर्मचारी हजेरी लावत असल्याने अद्यापही त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

आठशे नावे डुप्लिकेट असल्याने ३२०० कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. यापैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लसीबाबत भीती असल्याचे बोलता येणार नाही.

- डॉ. मंगला गोमारे (कार्यकारी आरोग्य अधिकारी)