Join us

ऑनलाइन शिक्षणाचा आर्थिक भुर्दड पालकांना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन पद्धतीने झाली आहे. शाळा बंद असल्या तरी, ऑनलाइन शिक्षण सुरू ...

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन पद्धतीने झाली आहे. शाळा बंद असल्या तरी, ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने पालकांना शालेय शुल्क तर द्यावे लागतच आहे, सोबतच इंटरनेट सुविधा, स्मार्टफोन, टॅब अशा संसाधनांचा अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नियमित शाळा असताना पालकांना शिक्षणासाठी शाळेच्या शुल्काबरोबरच शालेय गणवेश, वह्या-पुस्तके व शालेय साहित्यावर खर्च करावा लागत होता. आता ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी, हा खर्च पालकांना करावाच लागत आहे, उलट पालकांचा अतिरिक्त खर्च दुपटी-तिपटीने वाढला आहे.

सद्यस्थितीत के.जी. ते पी.जी.पर्यंतचे अध्ययन-अध्यापन ऑनलाइन स्वरूपात सुरू आहे. शिक्षणासाठी पालकांना दरमहा ठराविक रकमेचे रिचार्ज करावे लागते. मात्र अनेकदा वर्ग सुरू असताना नेटवर्कच गायब असल्याने ऑनलाइन उपस्थिती तर लागताच नाही, शिवाय रिचार्जही वाया जातो. एका घरात जर दोन किंवा तीन अपत्ये असतील व ती भिन्न वर्गांत शिकत असतील, तर पालकांना मोबाईलसह इंटरनेटचा खर्च वाढला आहे. मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे मोबाइल रिचार्जसह वायफायसाठी वेगळे रिचार्ज करावे लागत आहे.

मोठ्या वर्गातील मुलांना शाळा-महाविद्यालयांसह खासगी क्लास लावावे लागल्याने लॅपटाॅपसह पुरेसा डाटा उपलब्ध व्हावा, यासाठी वायफाय सेवा घ्यावी लागते. नोकरदार पालक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले असतील, तर कुटुंबाला दरमहा दीड ते दोन हजार रुपये इंटरनेट, मोबाईल रिचार्जसाठी खर्च करावे लागत असल्याची माहिती पुढे आली आहे.

ऑनलाइन शिक्षण खिशाला न परवडण्यासारखे

अभ्यासासाठी मोबाईल मुलांच्या हातात आला आहे. शाळेचा तास संपला तरी मुले मोबाईलवर गेम खेळण्यात, व्हिडिओ पाहण्यात व्यस्त राहतात. त्यामुळे ठराविक रकमेच्या रिजार्चमुळे दररोजचा डाटा ठरलेला असतो. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होत असल्याने रिचार्जसाठी जास्तीचा खर्च वाढल्याने शिक्षण खर्चिक बनले आहे.

- प्रतीक्षा पाटील, पालक

माझ्या घरी दोन मुले आहेत. एक सातवीत आणि एक नववीत आहे. दोघांचीही शाळेची फी भरायची आहे. पुस्तके, वह्या घ्यायच्याच आहेत. दोघांसाठी दोन मोबाईल आहेत. त्यांचा इंटरनेटवरचा महिन्याचा खर्च आहेच. शिक्षण ऑनलाइन असले तरी, शाळा पूर्ण फी घेत आहे. फी नाही भरली तर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले जाते.

- विशाल पवार, पालक

मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. पण प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणात बरीच तफावत आहे. मुलांना मानसिक विकासासाठी मोकळे वातावरण असणे अपेक्षित आहे. मोबाईलवर अभ्यास असल्याने मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाइन शिक्षणात शिस्तीची कमतरता निर्माण होते.

- डॉ. सिद्धी सावंत, मानसोपचार तज्ज्ञ

चौकट

- गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाइन अध्यापन असल्याने अनेक पालकांना मोबाईल, टॅब, लॅपटाॅप खरेदी करावे लागले आहेत.

- ज्या भागात इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे, तिथे रिचार्जची रक्कम वाया जात आहे.

- दोन, तीन मुले असतील, तर पुरेशा इंटरनेट डाटासाठी वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. अनेक वेळा इंटरनेट सेवाही कोलमडत असल्याने मुलांचे नुकसान होते.