Join us  

शैक्षणिक भूखंडांचे आॅनलाइन वाटप

By admin | Published: January 30, 2015 1:34 AM

सिडकोच्या सामाजिक सेवा विभागातर्फे शैक्षणिक प्रयोजनाच्या भूखंड वाटपासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या सामाजिक सेवा विभागातर्फे शैक्षणिक प्रयोजनाच्या भूखंड वाटपासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सिडकोच्या संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. बुधवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ऐरोली (सेक्टर १८) , नेरुळ (सेक्टर २८ व सेक्टर ४० ), सीबीडी बेलापूर येथील (सेक्टर १५ ), खारघर (सेक्टर ३६ व १६ ) तसेच तळोजा सेक्टर २१ अशा विविध नोड्समध्ये हे भूखंड उपलब्ध आहेत. त्यासाठी अनुभवी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व योजना पुस्तिकेतील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत विश्वस्त संस्थांना अर्ज करता येणार आहे. अर्ज आॅनलाइन भरून अपलोड करण्याची सुविधा आहे. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेली महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून पाठविणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याबाबत अडचणी असणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.अर्ज आॅनलाइन सादर करण्याची अंतिम मुदत १८ मार्च २०१५ पर्यंत असून सर्व कागदपत्रांचा मूळ प्रती आणि इसारा रक्कम व योजना पुस्तिकेच्या किमतीचा डिमांड ड्राफ्ट सादर करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०१५ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आहे. अयशस्वी निविदांची अनामत रक्कम त्यांच्या बँकेमार्फत परत मिळेल त्यासाठी त्यांनी बँक खात्याचा तपशील आॅनलाइन भरणे बंधनकारक असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रसंगी पणन विभागाचे व्यवस्थापक विवेक मराठे, सामाजिक सेवा अधिकारी रिमा दीक्षित, व्यवस्थापक (प्रणाली) फैय्याज खान आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)