Join us  

रेल्वे रूळ ओलांडताना एक प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 1:15 AM

पादचारी पुलाचे काम अपूर्ण; कुर्ला-चुनाभट्टी येथील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

मुंबई : कुर्ला येथील रेल्वे पादचारी पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. परिणामी प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करत आहेत. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना जखमी झाला.गुरुवारी दुपारी ४.१० च्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना कुरेशीनगर येथील रहिवासी मुस्तफा कुरेशी याचा अपघात झाला. त्याच्यावर सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला येथील स्वदेशी मिल रोड ते सर्वेश्वर मंदिर रोड यांना जोडणाऱ्या रेल्वे रुळावरील पादचारी पुलाचे काम मागील दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. या रखडलेल्या कामामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.कुर्ला पश्चिम दिशेकडे सर्वेश्वर मंदिराच्या दिशेच्या बाजूला पुलाच्या मध्यभागी भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामाला अडथळा होत आहे. आतापर्यंत अनेकदा पुलाचा आराखडा बदलण्यात आला आहे. पुलाचे काम सुयोग्यरीतीने आणि युद्धपातळीवर सुरू न केल्यास साखळी उपोषणाचा इशारा रेल यात्री परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिला. मुस्तफा कुरेशी याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला मार लागला आहे, अशी माहिती मुस्तफाचा भाऊ मजहर कुरेशी यांनी दिली.कुर्ला पश्चिमेकडील सर्वेश्वर मंदिराकडील संथगतीने चालू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान भंगार साहित्य मधोमध जमा करण्यात आले आहे़ यामुळे कामकाजास अडथळा निर्माण होत असल्याचे दिसते.चुनाभट्टी दिशेकडील स्वदेशी मिल विभागात आखुड अंतरावर उतरवलेला पूल. पूर्वी येथे लांब अंतरापर्यंत उतार असलेला पूल होता, मात्र आता आखुड बांधलेल्या या पुलामुळे गरोदर स्त्रीया, अपंग तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास होणार आहे़ याच्या विरोधात रहिवाशी एकत्र येत अयोग्य पुलाच्या चाललेल्या संथगतीच्या कामाचा निषेध करून पूर्वीप्रमाणे उताराच्या ब्रिजची मागणी केली.स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णालय, बाजारपेठेत जाण्यासाठी पूल ओलांडून कुर्ला पश्चिमेकडे जावे लागते. रेल्वे प्रशासनाच्या अंदाधुंदी कारभारामुळे वारंवार अपघात होत आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.दुसरी बाजू अधांतरीचकुर्ला पश्चिमेकडील सर्वेश्वर मंदिर येथे उतार असणारी पुलाची दुसरी तशीच अधांतरीच राहणार असल्याचे चित्र आहे़ इतक्या दिवसात तेथे काहीही करण्यात आले नाही़ मात्र तेथेही आता दोन वर्षांमध्ये भंगार साहित्य ठेवण्यात आल्याने जीर्ण अवस्थेतील पुलाचे विदारक चित्र दिसून येते.