Join us  

एक कोटींची खंडणी मागणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:29 AM

गुन्हे शाखेची कारवाई : नेपाळच्या सिम कार्डचा वापर करत दिली धमकी

मुंबई : नेपाळचे सिम कार्ड वापरत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाºया व्यक्तीला मंगळवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. कक्ष ९ने ही कारवाई केली असून, इमरान शेख (३८) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार, त्यांचा भाऊ आणि मेव्हणा यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मोबाइलवर नेपाळच्या सिम कार्डवरून फोन येत होते.

फोन करणारा त्यांच्याकडे एक कोटीची मागणी करत होता, तसेच पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने, त्यांनी याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ कडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, कक्ष ९चे प्रमुख महेश देसाई याबाबत चौकशी करत होते. तक्रारदाराला येणारा फोन नंबर त्यांनी पडताळला, तेव्हा तो वापरणारी व्यक्ती मुंबईची असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार, त्यांनी तांत्रिक तपास करत शेखला अटक केली. तो काही कामासाठी नेपाळला गेला होता, तेव्हा त्याने सिम कार्ड घेतले होते. त्याचा चुलत भाऊ अल्ताफ हा दाऊदच्या टोळीत होता आणि त्याची हत्या करण्यात आल्याचेही उघड झाले. भावाच्या मुलाला शैक्षणिक प्रवेशासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांकडे कबूल केले.