Join us  

वर्सोवा बीच व कुलाब्यात ऑलिव्ह रिडले कासवे आढळली जखमी अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:51 AM

दोन्ही कासवांवर उपचार सुरू

मुंबई : सोमवारी वर्सोवा बीच आणि मंगळवारी कुलाब्यातील ससून डॉक येथून ऑलिव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातींचे दोन कासव चिंताजनक स्थितीमध्ये आढळून आले. रॉ संस्थेने या दोन्ही कासवांची माहिती मिळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत. वर्सोवा बीच येथे आढळलेल्या कासवाच्या गळ्यामध्ये मासे पकडण्याचा काटा अडकला आहे. ससून डॉक येथील कासवाच्या पुढच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत.रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, वर्सोवा बीचवरून दुपारी ऑलिव्ह रिडले प्रजातीचा कासव जखमी अवस्थेत आढळून आल्याची माहिती संस्थेच्या हेल्पलाईनला मिळाली. वर्सोवा बीचवर स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांच्या मदतीने कासवाला ताब्यात घेतले. त्यानंतर उपचारासाठी पशुवैद्यक डॉ. रीना देव यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान कासवाचे एक्स-रे काढले गेले़ कासवाच्या गळ््यामध्ये मासे पकडण्याचा गळ अडकला होता. गळाची दोरी कासवाच्या शरीराच्या मागील भागातून बाहेर आली आहे. उपचारादरम्यान मासे पकडण्याचा गळ काढण्याचा प्रयत्न केला असता तो शरीराच्या आतमध्ये अडकल्याने बाहेर काढण्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे अजून एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.कुलाब्यातील ससून डॉक येथील मच्छीमारांनी ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव आढळून आल्याची माहिती कांदळवन विभाग आणि रॉ संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून दिली. रॉ संस्थेची रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत जखमी कासवाला ताब्यात घेतले गेले. त्वरीत त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या कासवाच्या पुढच्या दोन पायांना जखम झाली आहे. ही जखम मच्छीमारांच्या जाळ््यामध्ये अडकून झालेली असावी.