Join us  

बच्चेमंडळींसाठी म्हातारीचा बूट झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:07 AM

मुंबईची ऐतिहासिक व भौगोलिक रचना लक्षात घेऊन मुंबईकरांना आम्ही आश्वासित केलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक व भौगोलिक रचना लक्षात घेऊन मुंबईकरांना आम्ही आश्वासित केलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. महापालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे नूतनीकरण केलेल्या कमला नेहरू उद्यानाचे उद्घाटन विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले, त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, महापालिकेने मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात उद्याने, मैदाने साकारलेली आहेत. महापालिका उद्यानांची वैशिष्ट्ये म्हणजे अनेक दुर्मीळ झाडे महापालिकेच्या उद्यानात पाहायाला मिळतात. महापालिकेच्या उद्यानांमध्ये ज्येष्ठांसह लहानांना विविध मनोरंजनाची साधने महापालिकेने उपलब्ध करून दिली आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना विरंगुळ्याचे काही क्षण उद्यानामध्ये व्यतीत करताना निश्चितच आनंद मिळेल. मुंबईतील उद्याने ही मुंबईकरांना मोकळा श्वास देणारी फुप्फुसे आहेत. मुंबईकरांच्या सेवेत विविध स्वरूपाची उद्याने तयार करण्यात आली असून यापुढेही उद्याने विकसित केली जातील.नूतनीकरण केलेले कमला नेहरू उद्यान म्हणजे आज मुंबईला मिळालेली एक आगळीवेगळी अशी भेट आहे. १९५० साली साकारलेले हे उद्यान नव्या संकल्पनेवर आधारित असल्याने या नूतनीकरणात विविधता दिसत आहे. उद्यानातील अशोक स्तंभ, तीन ‘इको गजिबो’ यांच्या सभोवताली शोभिवंत झाडे, फुलझाडे यांची लागवड करून सुशोभीकरण, इंद्रधनुष्याच्या संकल्पनेनुसार सप्तरंगी सुशोभीकरण, व्ह्यूविंग गॅलरींच्या बाजूला नवीन अ‍ॅबॅकस ग्रिल, चार नवीन परगोला, ये रे ये रे पावसा या बालगीतावर आधारित फिश पॉण्डच्या सभोवती कारंजे, संपूर्ण बागेसाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा आदी कामे करण्यात आलेली आहेत. यासोबतच येथे साकारलेले सेल्फी पॉइंट नागरिकांना निश्चितच आवडतील.- संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)कमला नेहरू उद्यानातील म्हातारीच्या बुटाची दुरुस्ती, पूर्ण उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य व भौगोलिक रचना अबाधित राखून उद्यानाचा पूर्ण विकास करण्याचे महानगरपालिकेने ठरविले होते.त्याप्रमाणे उद्यानातील जागेचा अधिकाधिक व परिपूर्ण विकास करण्यात आला असून उद्यानामध्ये हिरवळीचे व वृक्षवल्लींचे प्रमाण जास्तीत जास्त वाढविले आहे. तसेच उद्यानाच्या दक्षिणेकडील जुन्या व्ह्यूविंग गॅलरीचे रुंदीकरण करून तो भाग सुशोभित करण्यात आला आहे.या ठिकाणावरून पर्यटकांना मरिन ड्राइव्हचे सौंदर्य अधिक न्याहाळता यावे व विहंगम दृश्याचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था महापालिकेने केली आहे.कमला नेहरू उद्यानाची वैशिष्ट्येकमला नेहरू उद्यान हे दक्षिण मुंबईमधील सर्वात उंच ठिकाणी असलेले स्थळ असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची ५४ मीटर इतकी आहे. या ठिकाणावरून गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह व अरबी समुद्राचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवता येते. सदर उद्यानाची निर्मिती १९५० साली झाली होती. या उद्यानाचे क्षेत्रफळ ४.१५ एकर आहे.