Join us  

जुहू बीचवर भरतीत वाहून आले ऑइल टार बॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 1:22 PM

गेल्या वर्षी सुद्धा दि, 20 जुलै 2018 ला येथे ऑइल टार बॉल आले होते.मात्र त्यांचा आकार मोठा होता

मनोहर कुंभेजकर

मुंबई - एकीकडे गुरुवारी सकाळी जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात ब्ल्यू बॉटल जेलिफिशची दहशत असतांना आज सकाळी जुहू बीचवर ऑइल टार बॉल समुद्राच्या भरतीत वाहून आले. ऑइल टार बॉल जरी आकाराने छोटे असले तरी आज येथे मोठया प्रमाणात ते नजरेस पडले आहेत. जुहू बीचवर समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ऑइल टार बॉल (ऑईलच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात आज सकाळी वाहून आले आहेत. सुमारे 4.5 किमीचा जुहू बीच अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे रोज येथे मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर चालतांना कसरत करावी लागत होती.

गेल्या वर्षी सुद्धा दि, 20 जुलै 2018 ला येथे ऑइल टार बॉल आले होते.मात्र त्यांचा आकार मोठा होता. खोल समुद्रात मोठी मालवाहू व तेलवाहू जहाजे असतात. त्यामधील ऑइल समुद्रात मिसळते आणि मग भरतीत हे काळ्याकुट्ट रंगाचे ऑइल टार बॉल विशेष करून पावसाळ्यात समुद्र किनारी वाहून येतात. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बीचवर चालताना या ऑइल टार बॉलचा खूप उग्र वास येतो आणि कपड्याला लागल्यास लवकर निघत नाहीत अशी माहिती  कनोजिया यांनी  दिली. 

या संदर्भात कोळी महासंघाचे सरचिटणीस व मत्स्य विषयक गाढे अभ्यासक राजहंस टपके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खोल समुद्रातील देशी-विदेशी मालवाहू किंवा तेल वाहू जहजांमधून झालेल्या तेल गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या जुहू समुद्रकिनारी येतात. तसेच मुंबई हायमध्ये असलेल्या तेल विहीरीमधून तेल काढत असताना होणाऱ्या गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या येथे आल्या असतील असं मच्छिमारांचं म्हणणं असल्याचं म्हटलं आहे. साधारण पावसात समुद्र खवळलेला असतो आणि पाऊस हा दक्षिणेकडून उत्तरेकडे येत असल्यामुळे समुद्राला करंट असतो. त्यामुळेच पावसात भरतीमध्ये या ऑइल गुठळ्या मुंबईतील समुद्रकिनारी आढळतात अशी माहिती टपके यांनी दिली. 

इतर देशात जर आपली जहाजे गेली तर तिकडे आंतरराष्ट्रीय नॉर्मसप्रमाणे जहाजातील टाकाऊ पाणीच काय पण साधा कचरा आणि ऑइलपण सोडता येत नाही. मात्र आपल्याकडील शासकीय यंत्रणा कमकुवत असल्यामुळे अशा घटना नेहमीच घडतात असा आरोप राजहंस टपके यांनी लोकमतशी बोलताना केला.

विधानपरिषदेवचे भाजपा आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांनी या संदर्भात आपण माहिती घेऊन यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर बैठक आयोजित करू अशी माहिती दिली.