मुंबई : ऑगस्ट महिना संपला तरी जुलै महिन्याचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ५०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली, मात्र रक्कम एसटीच्या खात्यात वर्ग झालेली नाही तर बेस्टकडून येणे असलेले ६० कोटी रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे हे पैसे लवकर मिळविण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत.
एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २७५ कोटींची आवश्यकता असते. जुलैचे वेतन मिळाले नाही तसेच ऑगस्ट महिनाही संपल्याने ७ सप्टेंबरला दुसरे वेतन द्यावे लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला एकूण ५५० कोटींची आवश्यकता आहे. राज्य सरकारने ५०० कोटी मंजूर केले आहेत, मात्र तेही अद्याप एसटीच्या खात्यात वर्ग झाले नाही. त्यासाठी अधिकारी मंत्रालयात फेऱ्या मारत आहेत.
कोरोनाकाळात बेस्टच्या मदतीला धावलेल्या लालपरीचे १९७ पैकी ६० कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. मात्र राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन खात्याकडून ती रक्कम आल्यानंतर आम्ही ६० कोटी देऊ असे बेस्ट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी मेपासून पाठपुरावा करूनही हे ६० कोटी मिळालेले नाही.
एसटी महामंडळाने कोरोनाकाळात नऊ महिने बेस्टला अविरत सेवा दिली. यावेळी कित्येक एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. काही जणांचा मृत्यूही झाला. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत देय मिळत नसेल तर ते चुकीचे आहे. ते तत्काळ देण्यात यावे, अन्यथा बेस्टच्या मुख्यालयावर मोर्चा काढू.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस