Join us  

अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

सायक्लॉन मॅन डॉ. मृत्युंजय महापात्रालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालच्या उपसागरात उठणाऱ्या चक्रीवादळांत फार काही बदल झालेले नाहीत. ...

सायक्लॉन मॅन डॉ. मृत्युंजय महापात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगालच्या उपसागरात उठणाऱ्या चक्रीवादळांत फार काही बदल झालेले नाहीत. मात्र, अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांची संख्या वाढते आहे. प्रत्येक वर्षी वाढत आहे, असे नाही; पण प्रमाण वाढते आहे. १९९९ पासून हे प्रमाण वाढत असून, वातावरण बदल यास कारणीभूत मानले जात असले तरी केवळ तो एकच घटक नाही. अरबी समुद्रात उठत असलेल्या चक्रीवादळांचा अभ्यास सुरू असून, समुद्रसतावरील तापमानात होत असलेली वाढदेखील यास कारणीभूत मानली जात आहे आणि मान्सून किंवा चक्रीवादळ हे घटक केवळ भारतीय हवामानावर अवलंबून नसतात तर जगभरातील हवामानाशी हे घटक निगडित असतात, असे भारताच्या हवामान विभागाचे प्रमुख आणि सायक्लॉन मॅन अशी ओळख असलेले डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

इंडियन मेटोरोलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरतर्फे हवामानशास्त्र आणि हवामान सेवांमध्ये अलीकडील प्रगती विषयांवरील आयोजित ई-कार्यशाळेत डॉ. मृत्युंजय महापात्रा बोलत होते. ते म्हणाले, नागरिकांना हवामानाची माहिती सहज मिळावी म्हणून आम्ही काम करत आहोत. हवामान क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत आहे. हवामानाशी प्रत्येक घटकाचा संग्रह व्हावा म्हणून आम्ही २००६ सालापासून आणखी वेगाने काम करत आहोत. यावर्षी पहिल्यांदा आपण प्रत्येक ठिकाणी कसा पाऊस होईल, याचा अंदाज देत आहोत. प्रत्येक महिन्याला होत असलेल्या पावसाचा अंदाज वर्तवित आहोत. आठवड्याचा, चार आठवड्यांचा अंदाज देत आहोत. पाच ते सात दिवसांचा अंदाज देत आहोत आणि आता तर नाऊ कास्टिंग म्हणजे पुढील ३ तासांच्या पावसाचा अंदाजही वर्तवित आहोत. मॉड्यूल सिस्टिम अपडेट करत आहोत. पुढील दहा दिवसांत बारा किलोमीटरमध्ये कुठे पाऊस होईल, असा अंदाज देत आहोत. परिसरनिहाय अंदाज देत आहोत. आपण देत असलेल्या अंदाजाचा आरोग्य, विमान क्षेत्र, कृषी, ऊर्जा, वाहतूक अशा क्षेत्राला फायदा होत आहे. हवामानाचे अंदाज १०० टक्के अचूकच येतील, असे नसल्याचे नमूद करत एक्स बँड रडार मुंबईत येणार आहे. रडार महाराष्ट्रात एक आहे. रत्नागिरीत एक रडार येणार आहे. जास्तीत जास्त रडार बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असून, यंदा मान्सून सरासरी इतका असेल. म्हणजेच चांगला असेल. टक्क्यांत ९८ इतका असेल. नंतरच्या अंदाजात मान्सून १०१ टक्के असेल, असे आपण म्हटले आहे. जेवढी निरीक्षण जास्त तेवढा अंदाज उत्तम, असे आपण नेहमी म्हणत असतो. आपण डॉप्लर, रडार वाढवीत आहोत. उत्तर कोकणात चार रडार लागणार असून, कोरोनामुळे काही अडचणी आहेत. स्वयंचलित हवामान केंद्र वाढविण्यावर आपण भर देत आहोत. पावसाचा प्रभाव कसा असेल, याची माहितीदेखील आपण देत आहोत. यात आणखी सुधारणा करत आहोत. दर तीन तासांनी हवामान वृत्त देण्याचा प्रयत्न करत असतो. मुंबईत वॉर्ड लेव्हल माहिती देत असतो. आपण समुद्रावर लक्ष ठेवत असतो. यासाठी उपग्रहाची मदत घेत असतो.

............................................