Join us  

सात वर्षात धोकादायक इमारतींच्या संख्येत पडली पाचपट भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 3:45 PM

दिवसेंदिवस ठाण्यात धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. परंतु पालिकेची महत्वांकाक्षी योजना क्लस्टर काही केल्या अद्यापही मार्गी लागतांना दिसत नाही. त्यामुळे मागील सात वर्षात शहरातील धोकादायक इमारतींची संख्या ही पाचपट वाढली आहे.

ठाणे : एकीकडे धोकादायक इमारत दुर्घटना घडत असतांना ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील सात वर्षापूर्वी ठाण्यात महापालिकेच्या सर्वेक्षणात १ हजार ७५ इमारती धोकादायक होत्या. त्यात यंदाच्या वर्षी पाच पट भर पडली असून यंदा पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरात ४ हजार ५१ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यंदा ठाण्यात इमारत दुर्घटना घडलेली नाही. परंतु पालिका प्रशासन याची वाट बघत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, क्लस्टर हा महत्वांकाक्षी प्रकल्प अद्यापही सुरु झालेला नाही.                           गेल्या काही वर्षाचा अनुभव पहाता, डोंगर परिसरात असलेल्या झोपड्या तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती रहाणाऱ्या नागरीकांना जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे पावसाळ्यात दरड कोसळणे जमीन खचणे असे प्रकार वेळोवेळी घडत असतात यात बºयाचदा जिवितहाणी होण्याचे प्रकारही घडले आहेत. कळवा मुंब्रा दरम्यानचा पारसिक डोंगराचा पूर्वेकडचा भाग मुंब्रा रेल्वेस्टेशन जवळच्या परिसरात बेकायदा इमारतींनी कळस गाठला आहे. कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागा सह कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर,आनंद नगर, गणपती पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोणेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर या सर्वच परिसरात बेकायदा झोपडपट्ट्या आणि अनाधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. दुसरीकडे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, इंदिरा नगर रूपादेवी पाडा लोकमान्य नगर राम नगर या ठिकाणच्या डोंगरावर बेकायदा झोपड्याच नव्हे तर किसन नगर, लोकमान्यनगर, यशोधन नगर , सावरकर नगर या परिसरात अनाधिकृत आणि धोकादायक इमारतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षात अशा परिसरात लहान मोठ्या बºयाच दुर्घटना घडल्या आहेत. आठ वर्षा पूर्वी मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते. तर लकी कंपाऊंड इमारत कोसळून अनेकांचे बळी गेले होते. तसेच ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसममितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभिर जखमी झाले होते. गेल्या पाच वर्षात ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती कोसळून शेकडो बळी गेले आहेत. परंतू दुर्घटना घडल्या नंतर क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यासाठी राजकीय मंडळींसह पालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली होती. त्यानुसार मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्या क्लस्टरचा नारळही वाढविण्यात आला होता. परंतु त्यानंतर एकाही क्लस्टरची वीट अद्यापही रचली गेलेली नाही. एकूणच महापालिका आणखी किती काळ धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणार, त्या इमारतींमधील रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करणार त्यांना हक्काचे घर मिळणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला असून या सर्व कारणांमुळे शहरात मात्र धोकादायक इमारतींची संख्या मात्र वाढतांना दिसत आहे.सात वर्षापूर्वी शहरात १ हजार ७५ इमारती या धोकादायक होत्या. परंतु आजच्या घडीला हीच संख्या ४ हजार ५१७ एवढी झाली आहे. एकूणच दरवर्षी पावसाळा आली की धोकादायक इमारीतंची संख्या ही हजाराने वाढत आहे. मात्र आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्यास असलेल्यांची यातून सुटका केव्हा होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त