Join us

राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:07 IST

राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती; पुढील किमान सहा महिने सतर्कता बाळगणे गरजेचेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमण ...

राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती; पुढील किमान सहा महिने सतर्कता बाळगणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत मागील काही दिवसांत राज्यात दैनंदिन रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय मागील एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अनलॉकचा पुढचा टप्पा आणि आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांनी किमान पुढील सहा महिने तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता राखणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, राज्यात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. मात्र, सामान्यांनीही संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोबतच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सामान्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीविषयी गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे.

* कोरोना रुग्णांसाठीच्या ७३ टक्के खाटा रिक्त

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, सध्या शहर, उपनगरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. शिवाय यंत्रणा संसर्ग पसरू नये यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नशील आहे. मात्र, सामान्य नागरिकांनीही यात योगदान देऊन मार्गदर्शक नियमांचे पालन केले पाहिजे. ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्येही घट झाली आहे. परिणामी, सध्या शहर व उपनगरात कोरोना रुग्णांसाठीच्या ७३ टक्के खाटा रिक्त आहेत.

.................................