Join us  

आता कळणार ‘बेस्ट’ची अचूक वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:46 AM

इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम : दोनशे बसथांब्यांवर एलईडी स्क्रीन बसविणार

मुंबई : बेस्ट भाडेकपातीनंतर आणखी एक बहुचर्चित प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर बेस्ट उपक्रम जीपीएस प्रणालीद्वारे प्रवाशांना बसगाड्यांची वेळ अचूक सांगू शकणार आहे. बस थांब्यावर कोणती बस किती वाजता आणि किती वेळेत येणार? याची माहिती प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात दोनशे बस थांब्यावर एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.

इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मेनेजमेंट सिस्टीमचा भाग असलेला हा अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. अनेक कारणांमुळे बेस्ट उपक्रमाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडला होता. मात्र महापालिकेच्या मदतीने आर्थिक गणिते सुटताच बेस्ट उपक्रमाचे अनेक प्रकल्प मार्गी लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार जीपीएस प्रणालीद्वारे मुंबईकरांना बसची अचूक वेळ सांगण्यासही बेस्ट आता सक्षम होणार आहे. त्यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच आता बस ठराविक थांब्यावर किती वाजता पोहोचणार हेदेखील कळणार आहे.मुंबईत सहा हजार बस थांबे असून दोनशे थांब्यांवर एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे सादरीकरण बेस्टसमितीच्या बैठकीत बेस्ट प्रशासनाने शुक्रवारी केली. मात्र या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याची तक्रार बेस्ट समिती सदस्यांनी केली. मुंबईत वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक असल्याने बस थांब्यावर अपेक्षित वेळेपेक्षा विलंबाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुगल बरोबर चर्चा करून करार करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.११२ कोटी खर्चआपल्या बस थांब्यावर कोणती बस किती वाजता येणार? ती बस कुठपर्यंत पोहोचली आहे, बसमधील एकूण प्रवाशी संख्या, विशेष बस मार्गावर धावणाऱ्या बसगाड्या याबाबतची सर्व माहिती बस थांब्यावरील एलईडी स्क्रीनवर दिसेल तेसच मोबाईल अ‍ॅपवरही कळू शकेल. यासाठी बसगाड्यांचे अचूक ठिकाण कळण्यासाठी बसगाड्या जीपीएस प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची किंमत ११२ कोटी रुपये आहे. यासाठी पालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.