Join us  

दहावीचा निकाल वाढविण्याचे आता महापालिकेसमोर लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:55 AM

ऑक्टोबरपासून बोर्डाच्या परीक्षेचा सराव; टक्का घसरल्याचा धसका

मुंबई : या वर्षी पालिका शाळांच्या निकालात तब्बल २०.६७ टक्क्यांनी घट झाली. याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, या वर्षी विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेचा सराव वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, हॉल तिकीट, वेळेवर प्रवेश, सुपरवायझरची नजर अशा वातावरणात आॅक्टोबरपासूनच पालिकेच्या विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात येणार आहे.गेल्या वर्षी पालिका शाळांचा दहावीचा निकाल ७३.८१ टक्के लागला होता. मात्र, या वर्षी यामध्ये मोठी घसरण दिसून आली. दहावीच्या परीक्षेत शाळांकडून मिळणारे अंतर्गत २० गुण बंद केल्यामुळे राज्याचा निकाल १२ टक्क्यांनी तर पालिका शाळांचा निकाल २०.६७ टक्क्यांनी घसरल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, या संदर्भात शिक्षण समितीने तातडीने बैठक घेऊन निकाल वाढविण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या.त्याप्रमाणे, सप्टेंबरपर्यंत दहावीचा अभ्यासक्रम संपवून आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. या सराव परीक्षेत कमी गुण मिळालेले किंवा नापास विद्यार्थ्यांचे गट तयार करून, त्यांना आवश्यक त्या विषयांचे प्रशिक्षण शिक्षक देणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गटाचे शिक्षक शिक्षणासाठी पालकत्व घेणार आहेत. या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने निकाल वाढेल, असा विश्वास शिक्षक व्यक्त करीत आहेत.असा होणार प्रशिक्षणाचा सराव...ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सराव परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे.बोर्डाप्रमाणेच प्रश्नसंच, निर्धारित वेळ देण्यात येईल.विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी दुसºया शाळांच्या शिक्षकांकडे पाठविले जाणार आहेत.या सराव परीक्षेतील निकालानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :दहावीचा निकाल