Join us  

आता विज्ञान केंद्रात अनुभवा ‘व्हर्च्युअल जग’ : बालदिनी भावी महापत्रकारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:34 AM

तुम्ही अंटार्टिका पाहिलेय का? अंटार्टिका येथील पेंग्विन्स पाहायचे आहेत का? तर मग आता इतक्या दूर अंटार्टिकाला जाण्याची गरज नाही.

मुंबई : तुम्ही अंटार्टिका पाहिलेय का? अंटार्टिका येथील पेंग्विन्स पाहायचे आहेत का? तर मग आता इतक्या दूर अंटार्टिकाला जाण्याची गरज नाही. कारण हाकेच्या अंतरावर याच मुंबापुरीच्या कुशीत नेहरू विज्ञान केंद्रात हा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे आता या नव्याने सुरू होणाºया दालनात अवघ्या काही मिनिटांत आपण बर्फाच्या डोंगरात फिरत आहोत, असा अनुभव घेता येईल. नव्या वर्षात सुरू होणारे हे दालन बालमित्रांसह सर्वांनाच भुरळ घालणारे ठरेल, हे निश्चित.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे निमित्त साधून, नेहरू विज्ञान केंद्रात या ‘आभासी दालना’चे उद्घाटन होणार आहे. या दालनातील सादरीकरण पाहून आपण वेगळ्याच जगात असल्याचा अनुभवता येईल. याखेरीज यंत्रसुद्धा किती शिताफिने काम करतात, हे दाखविण्यासाठी या दालनात एक रूबिक क्यूबचे इन्स्टॉलेशन असणार आहे आणि हे रूबिक क्यूब चक्क एक रोबोट त्याच वेळेस सोडविणार आहे. या दालनात संगणक आणि संगणकीय उपकरणांचा इतिहासही असेल. याशिवाय आपल्या मेंदूच्या एकाग्रतेमुळे आपण दिलेली सूचना एका स्क्रीनवर रूपांतरित होताना पाहायला मिळेल, तसेच हेलिकॉप्टर नियंत्रित करणारी एक परिवहन काच हे इन्स्टॉलेशन लक्षवेधी ठरेल. लाकडी खणांच्या बनविलेल्या गतिशील कॅनव्हासपासून तयार केलेला कॅलिडोस्कोप दालनाला भेट देणाºयांसाठी औत्सुक्याचा ठरेल. या दालनाला भेट देणाºयांसाठी आणि आनंद घेण्यासाठी कधीही न पाहिलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एक वेगळे विश्व असेल.नेहरू विज्ञान केंद्राचे क्युरेटर उमेशकुमार रस्तोगी यांनी या नव्या दालनाविषयी माहिती देताना सांगितले की, नेहरू विज्ञान केंद्र अद्ययावत करण्यासाठी नव्या-नव्या संकल्पनांविषयी कायम संशोधन आणि अभ्यास सुरू असतो. गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झालेला विस्तार पाहता, ही संकल्पना घेऊन काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न होता. त्याविषयी करण्यात आलेल्या अभ्यास आणि संशोधनातून नव्या दालनाचा विषय पुढे आला. आता लवकरच नवे जग मुंबईकरांसह पर्यटकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :मुंबई