Join us  

धनगर आरक्षणासाठी आता ढोल गर्जना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:42 AM

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याऐवजी झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आता ऐतिहासिक ढोल गर्जनेची गरज आहे.

मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याऐवजी झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आता ऐतिहासिक ढोल गर्जनेची गरज आहे. त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात २२ मे रोजी तब्बल पाच हजार ढोलांची गर्जना करण्याचा दावा धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.शेंडगे म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द फडणवीस सरकारने पाळला नाही. याउलट गरज नसताना टीस संस्थेमार्फत धनगर समाजाचे सर्वेक्षण करण्यात वेळकाढूपणा सुरू आहे. एकंदरीत सरकारने आरक्षणाबाबत झोपेचे सोंग घेतल्याचे दिसते. झोपलेल्या माणसाला एक ढोल वाजवून जागे करता येते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यासाठी मोठ्या ढोल गर्जनेची गरज असते. त्यामुळे धनगर बांधव पारंपरिक वेशभूषेत तब्बल पाच हजार ढोलांच्या गर्जनेने सरकारला सत्तेवरून पाय उतार होण्यास भाग पाडतील, असेही शेंडगे म्हणाले.महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. त्यात खांद्यावर घोंगडे, कमरेला धोतर, डोक्याला फेटा, हातात ढोल अशा पारंपरिक वेषभूषेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर जिल्ह्यांतील धनगर बांधव सामील होतील. धनगर संस्कृतीबरोबरच आपण आदिवासी कसे आहोत, याचे सादरीकरण या आंदोलनात होणार आहे. मंडळातर्फे सर्वपक्षीय नेत्यांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता उरलेल्या सर्व आमदारांना आंदोलनाचे निमंत्रण धाडणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर रस्त्यावरचे आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामराव वडकुते यांनी दिला आहे.शरद पवार प्रश्न सोडवू शकतात!धनगर आरणक्षाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आदिवासी समाजातील आमदारांनी कडाडून विरोध केला होता. मात्र धनगर समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळवून द्यायचे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते हा प्रश्न सहज सोडवू शकतात, असा दावाही शेंडगे यांनी केला आहे.>सत्ता परिवर्तनासाठी पंढरपूरमध्ये धनगर मोर्चासंविधानाने धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केलेला असतानाही, सरकारी अनास्थेमुळे धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी पंढरपूरमध्ये २० मे रोजी धनगर आरक्षण मोर्चा काढण्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सत्ता बदलासाठी एक मोठी घोषणाही त्याच वेळी करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर म्हणाले की, धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणाºया सरकारला साडेतीन वर्षे झाली आहेत, तरी धनगर समाजाचे कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. धनगरांना आदिवासी दर्जा देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत दिले होते. मात्र, त्यांनाही त्या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसते. म्हणूनच सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला आहे. त्यानुसार, २० मे रोजी पंढरपूर येथे सत्ता परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला, तरी एकाच पक्षाला इतक्या जागा मिळणे संशयास्पद असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. भंडारा, गोंदिया आणि पालघर निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.