Join us  

आता ऐनवेळी सायकल पंक्चर झाली, तर नो टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 3:03 AM

मोफत पंक्चर किट उपलब्ध

- सचिन लुंगसेमुंबई : कोरोना काळात सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी ऐनवेळी पंक्चर झालेली सायकल सर्वांचीच पंचाईत करते. अशावेळी सायकलस्वाराला आहे त्याठिकणी किंवा तेथून काही अंतरावर पंक्चर काढता यावे म्हणून तरुण सायकलस्वारांचा ग्रुप सरसावला आहे. या ग्रुपने आजघडीला पश्चिम उपनगरातील गोराई, उत्तनसह लगतच्या परिसरात मोफत पंक्चर किट उपलब्ध करून दिले असून, याद्वारे ऐनवेळी पंक्चर झालेली सायकल लगेच दुरुस्त करता येते. मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर परिसरात या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.कोविडमुळे सायकल चालवणे ही आरोग्याकरिता जागरूक असलेल्यांची पहिली पसंती झाली आहे. गोराई, मनोरी, उत्तन ही निसर्गरम्य ठिकाणे मुंबईतील सायकलिस्टना नेहमीच खुणावत असतात. अशा ठिकाणी सायकल पंक्चर झाली किंवा इतर काही बिघाड आल्याने सायकल फेरीचा गोंधळ होतो. सकाळी किंवा संध्याकाळी सायकल दुरुस्त करणारी दुकाने बंद असल्याने पंचाईत हाेते. यावर उपाय म्हणून सायकलप्रेमींनी नुकतीच सायकलिस्ट असोसिएशनची स्थापना करून वेगळी संकल्पना अमलात आणली आहे.पंक्चर झाल्यावर लागणारी साधने, जसे पाना, पक्कड, तयार रीलिव्हर, पंक्चर पॅच, सोल्युशन आणि हवा भरायला लागणारा पंप, अशा साधनांंचे किट बनवून डोंगरी - उत्तन - गोराई - पागोडा - मानोरी येथे ठेवले आहे. पंक्चर किट दिवसरात्र उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक दुकानदार, पोलीस ठाणे यांची मदत घेऊन पुढील ठिकाणी पंक्चर किटस्‌चे नेटवर्क तयार केले आहे.किट भारतभर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशीलसायकलिस्टची पंक्चर, ब्रेक लूज आणि इतर सामान्य कारणांमुळे होणारी गैरसोय टाळता यावी यासाठी असे किट भारतभर उपलब्ध व्हावेत, यासाठी असाेसिएशन प्रयत्नशील आहे. आपल्या जवळपासच्या सायकलिंग डेस्टिनेशनवर अशा पंक्चर किटची व्यवस्था करावी आणि गुगल मॅपवर त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती असाेसिएशनच्या अमर नडगेरी, इरफान शेख, सोम रुईया, सचिन पठारे, एजाज आणि सागर कारणे यांनी सायकलप्रेमींना केली आहे.