Join us

कार्बन उत्सर्जनापासून मुक्ती मिळविण्यासाठी आता ‘बेस्ट’ चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 7:08 AM

वातावरण फाउंडेशनचा पुढाकार; सौरऊर्जेवर धावणाऱ्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर; प्रयोग यशस्वी करण्याचे प्रयत्न

सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत असून, डिझेलवर धावणारी वाहने कार्बन उत्सर्जन करून यात आणखी भर घालत आहेत. परिणामी, माझगाव, बीकेसी, बोरीवली, अंधेरी, चेंबूरसह नवी मुंबईसारखी ठिकाणे प्रदूषित होत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेता, किमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तरी सौरऊर्जेवर चालावी, म्हणून आता ‘वातावरण फाउंडेशन’ने ‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’ हाती घेतले आहे.या कॅम्पेनअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय काय करता येईल? याकरिता फाउंडेशनचे समन्वयक मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासन यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहेत.जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि शहर स्तरावर प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. विशेषत: कारखान्यांतून बाहेर सोडले जाणारे वायू, इमारत बांधकामातून बाहेर पडणारे कण, अशा अनेक घटकांमुळे मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढत आहे. यात भर म्हणून की काय, डिझेलवर धावणारी वाहने कार्बन उत्सर्जन करत हवा आणखी बिघडवत आहेत. यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित केले जात असले, तरी वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळावा लागतो. तो जाळताना पुन्हा कार्बन उत्सर्जन होते. परिणामी, यावर उपाय म्हणून सौरऊर्जेवर धावणारी वाहने रस्त्यावर आणता येतील का? याबाबत ‘वातावरण फाउंडेशन’ने चळवळ हाती घेतली आहे. विशेषत: सार्वजनिक वाहतूक प्रणालीस यात अंतर्भूत करण्यासाठी ‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’ हाती घेण्यात आले असून, या अभियानांतर्गत मुंबई महापालिका आणि बेस्टसोबत फाउंडेशनच्या चर्चा सुरू आहेत. केवळ महापालिका आणि बेस्ट नाही, तर मुंबई शहर आणि उपनगरातील विविध महाविद्यालयांसह पर्यावरणासाठी काम करत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवित ‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’ मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.बेस्ट प्रशासनाकडे हजारो बसगाड्या असून, यातील बहुतांश बसगाड्या या डिझेलवर धावत आहेत. काही बसगाड्या सीएनजीवर धावत असून, काही विजेवर धावत आहेत. मात्र, हे पुरेसे नाही. कारण यातून होत असलेले प्रदूषण रोखता येत नाही. परिणामी, जर सौरऊर्जेवर धावणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रणालीवर जोर दिला, तर काही प्रमाणात का होईना, प्रदूषण रोखणे शक्य होईल, असा विश्वास ‘वातावरण फाउंडेशन’ला आहे. दरम्यान, जगभरात अद्यापही सौरऊर्जेवर धावत असलेल्या वाहनांचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये हे प्रयोग होत असले, तरी अद्यापही त्यास यश आलेले नाही, अशी माहिती ‘वातावरण फाउंडेशन’कडून देण्यात आली.‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’मध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावेमुंबईतील प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. बीकेसी प्रदूषित होत आहे. थंडीत हे प्रमाण आणखी वाढत आहे. दिल्लीसारखी परिस्थिती मुंबईत आहे. समुद्र असल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही किंवा त्या प्रमाणात तो जाणवत नाही. तरीही प्रदूषण कमी करण्यासाठी, स्वच्छ हवेसाठी मुंबईकरांनी आवाज उठविला पाहिजे, अन्यथा येत्या दहा वर्षांत मुंबईदेखील ‘गॅस चेंबर’ होईल. परिणामी, प्रदूषण कमी व्हावे आणि मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी, याकरिता आम्ही ‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’ हाती घेतले असून, मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.- राहुल सावंत, कॅम्पेनर, वातावरण फाउंडेशन.‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’मध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावेमुंबईतील प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. बीकेसी प्रदूषित होत आहे. थंडीत हे प्रमाण आणखी वाढत आहे. दिल्लीसारखी परिस्थिती मुंबईत आहे. समुद्र असल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही किंवा त्या प्रमाणात तो जाणवत नाही. तरीही प्रदूषण कमी करण्यासाठी, स्वच्छ हवेसाठी मुंबईकरांनी आवाज उठविला पाहिजे, अन्यथा येत्या दहा वर्षांत मुंबईदेखील ‘गॅस चेंबर’ होईल. परिणामी, प्रदूषण कमी व्हावे आणि मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी, याकरिता आम्ही ‘सोलारवाला बेस्ट कॅम्पेन’ हाती घेतले असून, मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.- राहुल सावंत, कॅम्पेनर, वातावरण फाउंडेशन.