नोटा, नाण्यांची वैशिष्ट्ये वारंवार का बदलता? हायकोर्टाचा RBI ला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 06:30 AM2019-08-02T06:30:33+5:302019-08-02T06:30:37+5:30

उच्च न्यायालयाचा रिझर्व्ह बँंकेला सवाल : सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश

Note, why change the characteristics of coins frequently? | नोटा, नाण्यांची वैशिष्ट्ये वारंवार का बदलता? हायकोर्टाचा RBI ला सवाल

नोटा, नाण्यांची वैशिष्ट्ये वारंवार का बदलता? हायकोर्टाचा RBI ला सवाल

googlenewsNext

मुंबई : नोटांचे व नाण्यांचे आकार आणि त्यांची वैशिष्ट्ये वारंवार बदलत असल्याने उच्च न्यायालयाने गुरुवारी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ला धारेवर धरले. अशी कोणती स्थिती निर्माण झाली आहे की त्यामुळे तुम्हाला (आरबीआय) वारंवार नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये आणि आकार बदलावा लागत आहे, असा सवाल करत उच्च न्यायालयाने आरबीआयला याबाबत सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लार्इंड (नॅब)ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने वरील प्रश्न आरबीआयला केला. आरबीआयच्या नव्या नोटा आणि नाण्यांमुळे दृष्टिहिनांना ती ओळखणे कठीण जात आहे. त्यामुळे नव्या नोटा व नाणी त्यांना ओळखता येतील, यासाठी नवे मोबाइल अ‍ॅप काढण्याचे निर्देश आरबीआयला द्यावेत, अशी विनंती नॅबच्या वतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला केली. वारंवार नोटा व नाण्यांची वैशिष्ट्ये व आकार बदलावे लागण्यासारखी कोणती परिस्थिती उद्भवली आहे, असा प्रश्न उच्च न्यायालयाने करताच आरबीआयच्या वकिलांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली आणि त्यामुळेच जुन्या नोटा व नाणी बदलावी लागली, असे न्यायालयाला सांगितले.

‘दृष्टिहिनांना ओळखता यावी म्हणून नवी नाणी’
नोटाबंदी केल्यावर काळा पैसा देशात आला का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने आरबीआयला टोला लगावला. दृष्टिहिनांना नाणी ओळखता यावीत, यासाठी नवी नाणी मार्चमध्ये काढल्याची माहिती या वेळी आरबीआयने न्यायालयाला दिली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी सहा आठवड्यांनंतर ठेवली आहे.

Web Title: Note, why change the characteristics of coins frequently?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.