In 'North-Central' Poonam's mother involve in campaign | ‘उत्तर-मध्य’मध्ये पूनम यांच्या प्रचारात ‘आई’, ‘ताई’ सक्रिय
‘उत्तर-मध्य’मध्ये पूनम यांच्या प्रचारात ‘आई’, ‘ताई’ सक्रिय

खलील गिरकर 

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या विद्यमान खासदार व पक्षाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या मातोश्री रेखा महाजन यांचा समावेश आहे. पूनम महाजन यांना कार्यकर्त्यांमध्ये ताई नावाने संबोधले जाते त्यामुळे या मतदारसंघात आई व ताई प्रचारात सक्रिय असल्याचे चित्र आहे. महाजन यांची लहान मुलगी अविका अनेकदा त्यांच्या प्रचारामध्ये पूनम महाजन यांच्या सोबत असते. त्यांच्या घरच्या इतर सदस्यांपैकी इतरांचा प्रचारामध्ये जास्त सहभाग नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम महाजन यांचा अर्ज भरताना त्यांच्या आई रेखा महाजन स्वत: जातीने हजर होत्या. महाजन यांनी त्याचे छायाचित्र त्यांच्या ट्विटर अकाउंटला पिन करून ठेवले आहे. पूनम यांचे पती व दोन मुले मात्र प्रत्यक्ष प्रचारापासून दूर आहेत. रेखा महाजन या अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होत्या त्याचप्रमाणे त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात लेकीच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

पूनम महाजन । भाजप
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कार्यरत, २०१४ मध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी. ऑगस्ट २०१० मध्ये भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली होती. २००९ मध्ये घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती; मात्र त्या वेळी मनसेच्या राम कदम यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

मुलगी । अविका
पूनम महाजन यांची अविका ही मुलगी ५ वर्षांची आहे. लहान असल्याने अधूनमधून ती महाजन यांच्यासोबत प्रचारामध्ये असते. तिला सोबत घेऊन महाजन प्रचारात सहभागी होतात. इतर वेळी त्यांची मुलगी घरीच असते. महाजन यांचे पती, त्यांचा मुलगा यांनी प्रचारात सहभाग घेतलेला नाही.

आई । रेखा महाजन
पूनम यांच्या आई रेखा महाजनदेखील त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. सोसायट्यांच्या छोटेखानी सभांमध्ये त्या स्वत: भाषण करून व उपस्थितांशी संवाद साधून आपल्या मुलीच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.


Web Title: In 'North-Central' Poonam's mother involve in campaign
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.