No Wadia Hospitalization Privatized, hostess raised voice | वाडिया रुग्णालयाचे खासगीकरण नको, परिचारिकेने उठविला आवाज
वाडिया रुग्णालयाचे खासगीकरण नको, परिचारिकेने उठविला आवाज

मुंबई : वाडिया रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात तेथील परिचारिकेने आवाज उठविला आहे. २१ वर्षे काम केलेल्या संस्थेच्या प्रति निष्ठा असल्याचे सांगत वैशाली पाटील यांनी लढा पुकारला आहे. याविरोधात नुकतेच पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहिले असून रुग्णालयाचे खासगीकरण न करता सर्वसामान्यांच्या सेवेकरिता त्यांना परवडणाऱ्या दरात सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाडिया रुग्णालयात २१ वर्षे काम केलेल्या वरिष्ठ पदावरील परिचारिका वैशाली पाटील यांनी रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. याविषयी श्रमिक विकास संघटनेच्या अध्यक्षा असलेल्या वैशाली यांनी सांगितले की, व्यवस्थापनाला अर्ज दिल्यापासून रुग्णालय प्रशासनाकडून दबाव येत आहे़ रुग्णालय प्रशासनाने याविषयी कोणताही प्रतिसाद दिलेल्या नाही़ मागील काही वर्षांत नियमांना फाटा देत औषधोपचार आणि सेवा-सुविधांचे दर वाढविल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, रुग्णालयीन कारभारात पारदर्शकता राहिली नसून याबाबत सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रदीर्घ काळ काम करूनही कर्मचाऱ्यांना मूलभूत शासकीय योजना लागू केल्या नसल्याचाही आरोप त्यांनी रुग्णालय प्रशासनावर केला आहे. रुग्णालय प्रशासनाने अनुदान मिळविण्यासाठी पालिका व राज्य शासनाला चोख हिशेब द्यावा, असेही पाटील यांनी अधोरेखित केले आहे. रुग्णांची आर्थिक पिळवणूक आणि गैरव्यवहार थांबविण्यासाठी या रुग्णालयाचा सरकारने ताबा घ्यावा, ही प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: No Wadia Hospitalization Privatized, hostess raised voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.