Join us  

शाळांमध्ये भगवीकरण नको; रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By सीमा महांगडे | Published: January 09, 2024 12:55 PM

शाळांमध्ये १० जानेवारीपासून प्रभू श्रीराम या विषयावर स्पर्धा.

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशानुसार पालिका शाळांमध्ये १० जानेवारीपासून प्रभू श्रीराम या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र हे शाळांचे भगवीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा कट असून ते थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी पत्र पाठवले असून वेळ आल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त पालिकेच्या शाळांमध्ये १ ते १५ जानेवारी दरम्यान ‘प्रभू श्रीराम’ या विषयावर विविध स्पर्धा आयोजित कराव्या असे आदेश दिले होते. त्यावेळी देखील आमदार रईस शेख यांनी विरोध केला होता. तसे पत्र १७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र तरीही महानगरपालिकेच्या शाळांत ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवचरित्र’ या विषयांवर १० ते १७ जानेवारी दरम्यान निबंध, चित्रकला, कवितालेखन व नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय जीवनात विविध महापुरुष, विविध ऐतिहासिक घटनांची माहिती पुस्तकातून तसेच कथाकथन माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यातूनच विविध गोष्टींचा, तसेच ऐतिहासिक क्षणांचा प्रभाव मुलांवर सकारात्मक होत असतो. त्याचा त्यांना पुढील आयुष्यासाठी उपयोग ही होतो. त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे पालकमंत्र्यांचे म्हणणे आहे.  महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने ५ जानेवारी रोजी त्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवचरित्र’ या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेणे सर्वस्वी बेकायदा आहेत. धार्मिक विषयांवरील स्पर्धांव्दारे बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे भगवीकरण करण्यास आमचा ठाम विरोध आहे, असे मत रईस शेख यांनी व्यक्त केले आहे.  

धार्मिक हेतूने शाळांमध्ये स्पर्धा भरवून भारतीय संविधानामधील धर्मनिरपेक्षता या मूल्यास तिलांजली देण्याच्या पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नास अटकाव करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, याप्रकरणी आम्हाला जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही - रईस शेख, आमदार

 

टॅग्स :भिवंडी