No relief to Three Ineligible Municipal Corporators of BMC | मुंबई महानगर पालिकेतील तीन अपात्र नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचाही दणका !
मुंबई महानगर पालिकेतील तीन अपात्र नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचाही दणका !

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना काल दि,24 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यासाठी नकार दिला.
मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका केशरबेन मुरजी पटेल (प्रभाग क्र. 76) आणि नगरसेवक मुरजी कानजी पटेल (प्रभाग क्र. 81) तसेच काँग्रेसचे नगरसेवक राजपती बरगून यादव (प्रभाग क्र. 28)यांचे जातप्रमाण पत्र जात पडताळणी समितीने गेल्या आॅगस्ट 2017 रोजी रद्द केले होते, त्या जात पडताळणीच्या निर्णयाला सदर नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सदर अपील गेल्या दि, 2 एप्रिल रोजी  सुनावणी नंतर  फेटाळून लावत जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय कायम ठेवला. 
 
मुंबई उच्च न्यायालयाने सदरचे अपील फेटाळल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गेल्या दि, 5 एप्रिल  रोजी सदर तिन्ही नगरसेवकांचे नगरसेवक पद भूतपूर्व प्रभावाने रद्द करण्याचा आदेश काढला आणि गेल्या दि,10 एप्रिल रोजी मुंबईच्या महापौरा प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्वसाधारण सभेत सदर आदेशाची घोषणा करून त्यावर शिक्कामोर्तब केले.लोकमतने गेल्या ऑगस्ट पासून या संदर्भातील घडामोडींचे  सविस्तर वृत्त दिले आहे.

या तिनही जणांनी सदर ।उंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले,काल दि,24  रोजी तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी सदर तिनही जणांचे अपील फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या तीनही जणांचा नगरसेवक होण्याचा मार्ग बंद झाला आहे,तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या नितिन बंडोपंत सलाग्रे (प्रभाग क्र. 76) तसेच शिवसेनेचे संदीप राजू नाईक (प्रभाग क्र. 81) आणि एकनाथ ज्ञानदेव हूंडारे (प्रभाग क्र. 28) यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 सर्वोच्च न्यायालयात केशरबेन आणि इतर यांच्याकडून वरीष्ठ वकील अ‍ॅड मुकुल रोहतगी, अ‍ॅड सुशील करंजकर, के. एन.  राय यांनी तर नितिन बंडोपंत सलाग्रे आणि इतर यांच्याकडून वरीष्ठ वकील अ‍ॅड शेखर नाफडे, वरीष्ठ वकील अ‍ॅड आर. बसंत, अ‍ॅड सुधांशू चौधरी आणि अ‍ॅड चिंतामणी भणगोजी यांनी काम पाहिले.


Web Title: No relief to Three Ineligible Municipal Corporators of BMC
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.