Join us  

पैसे नको; पण चांगले रस्ते द्या!; नेटकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:41 AM

पालिका कारभारावर टीका

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १ नोव्हेंबरपासून नामी शक्कल लढवत, ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ अशी योजना राबविली; मात्र पालिकेच्या या योजनेचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेत मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली. विशेषत: सोशल मीडियावर ‘पॉटहोलचॅलेंज2019’ हा हॅशटॅग असतानाच नेटकºयांनी अशा योजना राबविण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे लक्ष द्या, असा टोला लगावत ‘पैसे नको; पण चांगले रस्ते द्या’ अशी मागणी महापालिकेकडे केली.

दोन आठवड्यांपूर्वी भांडुप येथे झालेल्या रस्ते विभागाच्या बैठकीत रस्त्यांवरील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुझविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असा दावा पालिकेने केला. रस्त्यांवर खड्डे दिसलेच तर मात्र ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ ही योजना पालिकेने सुरू केली. परंतु या योजनेचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेण्यात येत आहे.

अशाप्रकारच्या योजनांत वेळ वाया घालविण्यापेक्षा खड्डे बुजविण्यावर लक्ष केंद्रित करावे, पुन्हा खड्डे पडू नयेत, यासाठी काय करता येईल, याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात यावे, अशी टीका सोशल मीडियावर मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांचा सर्वांत जास्त त्रास मराठी भाषिक नागरिकांना होत असताना ट्विट फाड फाड इंग्रजीत का?, वॉर्ड कर्मचारी खड्डे का भरत नाहीत? वायफळ खर्च कशाला, आधीच मंदी आहे, ही माहिती मराठीत का नाही? की तुमच्या एजन्सीमध्ये मराठी भाषिक नाहीत? की मुंबईत मराठी लोक नाहीत? तुमचे निवडून आलेले नगरसेवक तसेच सगळे इंजिनीअर्स रजेवर गेले आहेत का? त्यांना त्यांच्या वॉर्डमधले खड्डे दिसत नाहीत का, की त्यांच्या आलिशान महागड्या कारमधून प्रवास करताना हे खड्डे जाणवत नसावेत बहुतेक, अशा शब्दांत नेटकºयांकडून खिल्ली उडवली जात आहे.

मला पैसे नको; पण चांगले रस्ते द्या, खराब रस्त्यांचेपण फोटो काढून देतो तुम्हाला. मधेच रस्त्याचे काम केले जाते; पण लेवल केली जात नाही, अशा रस्त्यांवरपण लक्ष द्या, अशी मागणीही नेटकºयांकडून होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका