Join us  

जंगल नाही, जीव जळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:08 AM

हंगामी अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यासह वनविभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरजसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही ...

हंगामी अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यासह वनविभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यभरातील जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यास विविध कारणे असल्याचे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जंगलांना जे वणवे लागत होते ते वणवे उन्हाळ्याच्या शेवटी लागत होते. आता गेल्या काही वर्षांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणजे घटनास्थळी अथवा त्या परिसरात हंगामी अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात याो, या प्रमुख मुद्द्यांवर जोर देण्यात येत आहे.

मुंबईसह राज्यभरातील जंगलांना लागणाऱ्या वणव्यांवर उपाययोजना करण्याकरिता झटका नावाची संस्था काम करत आहे. झटका या संस्थेचे प्रतिनिधी रोशन केदार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबई किंवा राज्यभरातील जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. मुंबईतल्या जंगलांना आठवडाभरापासून आग लागत असून, ही आग शमविण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र अशा प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकार विशेषतः वनविभागाने मोठ्या प्रमाणावर काम केले पाहिजे. आपल्याकडचा वनविभाग काम करत नाही, अशी आमची तक्रार नाही. उलटपक्षी देशभरातील वनविभाग यांचा विचार करता महाराष्ट्रातील वनविभाग सर्वाधिक सक्षम आहे. फक्त वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातली पाहिजे. जंगलांना ज्या आगी लागतात त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वनविभागाने या क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांची मदत घेतली पाहिजे. जंगलांना आगी लागणार नाही त्यासाठी काम करताना उपाययोजना करण्यासाठीदेखील काम केले पाहिजे.

केवळ राज्य सरकार किंवा वनविभाग यांची भूमिका महत्त्वाची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. ती कशी तर जंगलांना लागणारे वणवे कमी करण्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत जंगलांना लागणाऱ्या आगी आणि त्यावरील उपाययोजना यासाठी आम्ही एक पिटिशन म्हणजे स्वाक्षरी अभियान हाती घेतले आहे. आरे येथील जंगल वाचविण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतला होता. आता आम्ही जी मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेत राज्यभरातील किमान पन्नास हजार नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आमचे म्हणणे आहे. कारण जंगलांना लागत असलेल्या आगीचा फटका सामाजिक, आर्थिक अशा प्रत्येक दृष्टिकोनातून बसत असतो. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटी आहे. यातील पन्नास हजार नागरिकांनी जरी सहभाग नोंदविला तरी जंगलांना लागत असलेल्या आगी, त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आम्हाला मोठ्या ताकदीने काम करता येईल, असेदेखील रोशन केदार यांनी सांगितले.

------------

जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण सर्वाधिक मुंबईत आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात जंगलांना सर्वाधिक आगी लागतात.

महाराष्ट्रातील वाढत्या वणव्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाअंतर्गत जिल्हानिहाय टास्क फोर्स तयार कराव्यात.

वणव्याच्या घटनांमधील दोषींवर कडक कारवाई व्हावी.

अग्निशमन दलाला वणवा विझवण्यासाठी लागणारी आधुनिक सामग्री आणि प्रशिक्षण देण्यात यावे.

उन्हाळ्यात वारंवार वणवा लागणाऱ्या डोंगरांजवळ अग्निशमन दलाची हंगामी केंद्रे उभारावीत.

------------