मुंबई : राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मागच्या आठवड्यात शिक्षण विभाग आणि राज्य टास्क फोर्सची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शिक्षण विभागाने आपल्याकडील आदर्श कार्यप्रणाली टास्क फोर्सला दिली आहे, तर टास्क फोर्सनेही त्यांची याबाबतची मानक कार्यप्रणाली विभागाकडे सोपविली आहे. शाळा सुरू करताना पालक आणि शिक्षकांवर अधिक जबाबदारी सोपवावी लागणार आहे. टास्क फोर्ससोबतच बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबतही आम्ही चर्चा केली आहे. आगामी काळात आणखी काही बैठका आणि चर्चा होतील. शिक्षण विभागाकडून मानक कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षित करून शाळेबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. मानक प्रणालीबाबत टास्क फोर्सकडून सूचना आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि त्यानंतर शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.