Join us  

संभ्रम नको...! आजच साजरी करा विजयादशमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:42 PM

दा. कृ. सोमण : श्रवण नक्षत्रानिमित्ताने योग

मुंबई : गुरुवार, १८ रोजी अर्धा दिवस नवमी आणि नंतर दशमी सुरू होऊन ती शुक्रवारी संपते. त्यामुळे दसरा नेमका कोणत्या दिवशी साजरा करायचा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता. मात्र, गुरुवारी अपरान्हकाली व प्रदोषकाली अश्विन शुक्ल दशमी असल्याने याच दिवशी विजयादशमी (दसरा) साजरी करावी, असे पंचांगकर्ते तथा खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. तसेच श्रवण नक्षत्रानिमित्ताने हा एक दुग्धशर्करा योग असल्याचेही त्यांनी सांगितले.

या विषयी सोमण म्हणाले की, हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी अष्टभुजा देवीने दुष्ट महिषासुर राक्षसाला ठार मारले. या वेळी देवीने ‘विजया’ हे नाव धारण केले. म्हणूनच दसऱ्याच्या सणाला ‘विजयादशमी’ म्हणतात. या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या झाडाच्या ढोलीत लपविलेली शस्त्रे बाहेर काढून त्यांची पूजा करून ती वापरण्यास सुरुवात केली. कोत्साने याच दिवशी शमी व आपट्याच्या झाडाखाली ठेवलेल्या सुवर्णमुद्रा लोकांना नेण्यास सांगितल्या. अश्विन महिन्यात शेतातील धान्य घरात येते म्हणून या दिवशी हा समृद्धीचा सण साजरा केला जातो.

आधुनिक काळात अंधाराकडून प्रकाशाकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धांकडून वैज्ञानिक दृष्टीकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे, असेही सोमण यांनी सांगितले. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन करावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :दसरा