Join us

व्होल्वोसाठी एनएमएमटीचा स्वतंत्र डेपो

By admin | Updated: February 13, 2015 04:42 IST

मागील अनेक वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या वाशी सेक्टर १२ येथील डेपोच्या जागेचा विनियोग करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे.

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या वाशी सेक्टर १२ येथील डेपोच्या जागेचा विनियोग करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. या जागेवर उपक्रमातील व्होल्वो गाड्यांसाठी स्वतंत्र डेपो विकसीत करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.परिवहन उपक्रमाकडे तुर्भे, असूडगा, रबाळे आणि घणसोली हे चार डेपो आहेत. यापैकी सध्या तुर्भे आणि असूडगाव हे दोनच डेपो वापरात आहेत. तर घणसोली डेपोचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या एकूण ३६० गाड्या आहेत. यापैकी २८० साध्या, १० मिनी व ७० वातानुकूलीत अर्थात व्हॉल्वो बसेस आहेत. या सर्व बसेस तुर्भे आणि असूडगाव डेपोत उभ्या केल्या जातात. त्यामुळे अनेकदा नियोजन करताना अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर व्होल्वो बसेससाठी वाशी येथे एक वेगळा डेपो तयार करण्याची एनएमएमटीची योजना आहे. वाशी सेक्टर १२ येथे बस टर्मिनलसाठी ६५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा भूखंड विनावापर पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भूखंड वापरात आणण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. व्होल्वोसाठी येथे स्वतंत्र आगार करण्याची योजना आहे. गॅरेज, डिझेल पंप, कार्यालयीन कामकाजासाठी निवारा केंद्र आदी सुविधा येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात व्होल्वोच्या चाळीस गाड्या उभ्या करता येणार आहेत. आठ दिवसांत प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एनएमएमटीचे प्रभारी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)