Join us  

एनएमएमटीचे आता फिडर मार्ग

By admin | Published: May 25, 2015 2:30 AM

शहरातील प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने एनएमएमटी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून तोट्यात चाललेले

नवी मुंबई : शहरातील प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने एनएमएमटी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून तोट्यात चाललेले काही लांब पल्ल्याचे मार्ग बंद करून शहरातल्या शहरात कमी अंतराचे अर्थात फिडर मार्ग सुरू करण्याची व्यवस्थापनाची योजना आहे.एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या एकूण ३६० बसेस आहेत. यात ७० वातानुकूलित गाड्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच उरण, पनवेल, खारघर आणि तळोजा आदी ४९ मार्गांवर या गाड्या धावतात. विशेष म्हणजे यातील अनेक लांब पल्ल्यांचे मार्ग उपक्रमासाठी तोट्याचे ठरले आहेत. त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने उपक्रमाच्या तोट्यात भर घालणारे हे मार्ग बंद करण्याचे धोरण व्यवस्थापनाने आखले आहे. त्याऐवजी शहरवासीयांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने शहरातल्या शहरात कमी अंतराचे म्हणजेच फिडर मार्ग सुरू करण्याची व्यवस्थापनाची योजना आहे. त्यानुसार रेल्वे स्थानके आणि नागरी वसाहती या दरम्यान नवीन मार्ग सुरू करण्याची उपक्रमाची योजना आहे. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे अतिरिक्त मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. एकूणच या सुविधेचा शहरवासीयांना अधिकाधिक लाभ व्हावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.